शहर सहकारी बँक बोगस कर्ज प्रकरणात महत्त्वाची अपडेट
By अण्णा नवथर | Published: December 18, 2023 03:06 PM2023-12-18T15:06:40+5:302023-12-18T15:06:56+5:30
निलेश शेळकेचा सी.ए. मर्दा याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ
अहमदनगर: शहर सहकारी बँकेतील बोगस कर्ज प्रकरणात डॉ. निलेश शेळके याला मदत करणारा त्याचा सीए विजय मर्दा याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सह दिवाणी न्यायाधीश पी.बी. रेमणे यांनी सोमवारी हा निकाल दिला.
शहर सहकारी बँकेतील नवीन हॉस्पिटल उभारून त्यातील वैद्यकीय साहित्य सामग्री खरेदी करण्याच्या नावाखाली डॉ. निलेश शेळके याने फसवणूक केल्याप्रकरणी त्याचा सीए मर्दा याला अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याला १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आरोपीला सोमवारी सहदिवाणी न्यायाधीश पी.बी. रिमने यांच्या कोर्टासमोर हजर करण्यात आले होते.
यावेळी डॉ. निलेश शेळके याने बनावट खाते उघडून वेगवेगळ्या खात्यांवरून रक्कम ट्रान्सफर करत शेवटी ती काढून घेतलेली आहे. यामध्ये त्याला सीए मर्दा यांनी मदत केलेली आहे. परंतु याबाबत मर्दा हा कुठल्याही प्रकारची माहिती पोलिसांना देत नाही. ही माहिती त्याच्याकडून मिळणे आवश्यक असल्याने त्याच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली होती. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. पी आर जासूद यांनी बाजू मांडली.