लोकमतच्या वृत्तानंतर भिंगार कॅम्प हद्दीत दारू, मटका अड्ड्यांवर छापे; ११ आरोपींवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:25 PM2017-11-08T12:25:17+5:302017-11-08T12:29:20+5:30
भिंगार शहरासह आलमगीर, दरेवाडी, कापूरवाडी परिसरात खुलेआम सुरू असलेला दारू व मटका अड्ड्यांबाबत ‘लोकमत’ने ४ नोव्हेंबर रोजी ‘भिंगारमध्ये खुलेआम मटका, दारूअड्डे सुरू’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर कॅम्प पोलिसांनी अवैध व्यवसायावर कारवाईस प्रारंभ केला.
अहमदनगर : भिंगार शहरासह परिसरात सुरू असलेल्या दारू व मटका अड्ड्यांचे स्टिंग आॅपरेशन करत या अवैध व्यवसायाचा ‘लोकमत’ने पर्दाफाश केल्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत तब्बल ११ ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. यामध्ये ११ आरोपींवर गुन्हा दाखल करत ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भिंगार शहरासह आलमगीर, दरेवाडी, कापूरवाडी परिसरात खुलेआम सुरू असलेला दारू व मटका अड्ड्यांबाबत ‘लोकमत’ने ४ नोव्हेंबर रोजी ‘भिंगारमध्ये खुलेआम मटका, दारूअड्डे सुरू’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर कॅम्प पोलिसांनी अवैध व्यवसायावर कारवाईस प्रारंभ केला.
पोलिसांनी पाच दिवसांत भिंगार येथील यशवंतनगर येथे छापा टाकून अवैध विक्री होत असलेली २ हजार ४९६ रुपयांची देशी दारू जप्त करून सुनील सत्यवान नवगिरे यांच्यावर गुन्हा दाखल केला़ दरेवाडी येथे छापा टाकून २० लिटर दारू, दारू बनविण्यासाठी वापरला जाणारा गूळ व एक मोटारसायकल असा २३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ या कारवाईत बाळासाहेब अशोक बर्डे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. यशवंतनगर येथील कारवाईत २ हजार रुपयांची गावठी हातभट्टी जप्त करण्यात आली. या प्रकरणी जावेद पटेल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी गौतमनगर येथे छापा टाकून १ हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली. यामध्ये गोरख मारुती भिंगारदिवे याच्यावर कारवाई करण्यात आली. बुरूडगाव रोड येथे छापा टाकून १५०० रुपयांची दारू जप्त करत गोरख काशिनाथ भुजबळ याच्यावर कारवाई करण्यात आली़ दरेवाडी येथे २ हजारांची गावठी दारू जप्त करून प्रशांत प्रमोद बोडखे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला़ कापूरवाडी येथे २ हजार रुपयांची दारू जप्त करत रंजना नामदेव ब्राह्मणे हिच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला़ वंजारवाडी येथे छापा टाकून २ हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली़ याप्रकरणी रावसाहेब चिमाजी अळकुटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भिंगारमध्ये ४ व ६ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी दोन ठिकाणी मटका अड्ड्यांवर छापा टाकून ७००रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ यामध्ये अजित पठाण व संजय खताडे यांच्यावर कारवाई केली.
घातक गावठी हातभट्टीची निर्मिती
भिंगार शहरासह परिसरातील गावांत अनेक ठिकाणी काळा गूळ, नवसागर व केमिकल वापरून गावठी हातभट्टी दारू तयार करून विकली जाते. ही दारू स्वस्त मिळत असल्याने अनेक जण या दारूच्या आहारी गेले आहेत. बनावट असलेली ही दारू शरीरासाठी अतिशय घातक आहे. पांगरमलप्रकरण अशाच बनावट दारूमुळे घडले आहे़ भिंगार कॅम्प पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईत किती दिवस सातत्य राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.