जनतादरबारात आलेल्या मुलाचे धाडस पाहून अंबादास दानवे भारावले
By शिवाजी पवार | Updated: January 30, 2024 17:33 IST2024-01-30T17:32:12+5:302024-01-30T17:33:17+5:30
वडिलांचे निधन, बालसंगोपनचा लाभ देण्याची मागणी.

जनतादरबारात आलेल्या मुलाचे धाडस पाहून अंबादास दानवे भारावले
शिवाजी पवार, अहमदनगर : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या येथील जनता दरबारात दहावीचा एक विद्यार्थी दाखल झाला. वडीलांचे निधन झाले असून बालसंगोपन योजनेचा लाभ मिळत नाही, असे गार्हाणे त्याने मांडले. विद्यार्थ्याचे धाडस पाहून दानवे यांनी त्याला स्वत: दहा हजार रुपयांची मदत केली. मोठा झाल्यावर माझी भेट घ्यायला ये, अशी ऑफरही त्यांनी दिली.
श्रीरामपुरातील पालिकेच्या आझाद मैदानावर मंगळवारी दानवे यांच्या उपस्थितीत जनतादरबार भरवण्यात आला होता. यावेळी जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, संजय छल्लारे, लखन भगत, सचिन बडधे, अशोक थोरे, डॉ. महेश क्षीरसागर, शेखर दुबय्या, निखिल पवार आदी उपस्थित होते.
जनता दरबारात आलेल्या मुलाचे नाव त्रिदेव रवींद्र कापसे होते. तो शहरातील मोरगे वस्ती भागात राहतो. त्याच्या वडिलांचे २०१६ मध्ये निधन झाले. आई शहरात धुणीभांडीचे काम करते. वडील गमावल्यामुळे सरकारच्या बालसंगोपन योजनेतून दरमहा आर्थिक मदत मिळेल. यातून शैक्षणिक खर्चाला हातभार लागेल, असे तो म्हणाला. विशेष म्हणजे तो येथे एकटाच आलेला होता. त्याचे हे धाडस पाहून अंबादास दानवे हे भारावले गेले. त्यांनी तातडीने दहा हजार रुपयांची आर्थिक मदत त्याला दिली. मुलाने ही मदत स्वीकारण्यास नकार दिला. मला योजनेचा लाभ मिळावा ही अपेक्षा आहे, असे तो म्हणाले. शहरातील पाटणी विद्यालयात दहावीच्या वर्गात तो शिक्षण घेतो. जनता दरबार अटोपल्यानंतर दानवे यांनी पुन्हा त्रिदेव याची भेट घेतली. मोठा झाल्यानंतर माझी आवश्य भेट घे. तु जर वयाने मोठा असता तर तुला माझ्यासोबत घेतले असते, असेही दानवे यांनी यावेळी सांगितले.