राष्ट्रवादीत बेईमानांना शिक्षा नाही, इमानदारांची कदर नाही; राष्ट्रवादीच्या माजी प्रदेश उपाध्यक्षाची टीका
By साहेबराव नरसाळे | Published: June 16, 2023 06:08 PM2023-06-16T18:08:42+5:302023-06-16T18:09:28+5:30
पक्षाला प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची कदर नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले व नुकतेच बीआरएस पक्षात गेलेले घनश्याम शेलार यांनी केली.
अहमदनगर - राष्ट्रवादी पक्षात गेली २३ वर्ष आपण प्रामाणिकपणे काम केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जे कृषीविषयक धोरण आहे, अगदी त्याच्या उलट धोरण पक्षातील लोकं राबवितात. पक्षात बेईमान नेत्यांचा भरणा होत असून, सध्या पक्ष राजकीयदृष्ट्या अस्थिर झाला आहे. पक्षातील बेईमान लोकांच्या अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, पक्षा त्यांच्यावर काहीही कार्यवाही करीत नाही. तसेच पक्षाला प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची कदर नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले व नुकतेच बीआरएस पक्षात गेलेले घनश्याम शेलार यांनी केली.
शेलार यांनी शुक्रवारी (दि. १६) येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, १४ जून रोजी आपण राष्ट्रवादीतून बाहेर पडलो आहोत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे शेतकऱ्यांविषयी अत्यंत स्पष्ट धोरण होते. परंतु पक्षातील लोकं अगदी त्याविरोधात भूमिका घेतात. अनेक कारखानदार नेते शेतकऱ्यांची देणी देत नाहीत. एफआरपीप्रमाणे उस उत्पादक शेतकऱ्यांना पेमेंट देत नाहीत. पक्षातील अशा नेत्यांची व पक्षविरोधी भूमिका घेऊन विरोधी पक्षांना निवडणुकीत मदत करणाऱ्यांची आपण अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. पण उपयोग झाला नाही.
राष्ट्रवादी हा शेतकऱ्यांचा कल्याणकारी पक्ष होईल, अशा अपेक्षेने आपण अनेक वर्ष मृगजळाच्या मागे धावत होतो. पण आता वास्तविक आशेचा किरण बीआरएसच्या रुपाने दिसला आहे. बीआरएसने तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना सुखी जीवन दिले आहे. महाराष्ट्रात व देशातही हा बीआरएस पॅटर्न लागू व्हावा, यासाठी आपण बीआरएस पक्षात दाखल झालेलो आहे. पक्षाची आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरु आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ जागा लढण्यासाठी पक्षाची तयारी सुरु आहे, असेही शेलार म्हणाले.