नवीन शिक्षण धोरणात महाविकास आघाडी सरकारकडून खोडा, चंद्रकांत पाटीलांचा टीकेचा बाण
By चंद्रकांत शेळके | Published: September 6, 2022 05:11 PM2022-09-06T17:11:14+5:302022-09-06T17:11:35+5:30
आता लोकांच्या मनातील सरकार आल्याने जोमाने शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करू, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य.
अहमदनगर : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नवीन शैक्षणिक धोरणाची देशभर अंमलबजावणी सुरू आहे. मात्र मागील अडीच वर्षांत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्राशी असहकार पुकारून त्याची अंमलबजावणी केली नाही. आता लोकांच्या मनातील सरकार आल्याने जोमाने शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करू," असे सांगत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तत्कालीन आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.
अहमदनगरजवळ असलेल्या बाबुर्डी घुमट येथे मंगळवारी (दि. ६) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन मंत्री पाटील व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाचे शिक्षण मिळणार आहे. ब्रिटिशांनी जी शिक्षण पद्धती स्वत:च्या स्वार्थासाठी भारतीयांवर लादली, त्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी नवीन शिक्षण पद्धती उपयोगी ठरेल. भारतीय संशोधन अतिशय प्रगत आहे. कोरोना काळात जगाला त्याची प्रचिती आली.
भारताने बनवलेल्या कोरोनाच्या लसीने केवळ भारतातील १३७ कोटी लोकांचेच नाही, तर जगभरातील ६० देशांतील लोकांचे प्राण वाचवले. कधी काळी ज्या अमेरिकेतून भारताला लाल गहू आयात करून माणसे जगवावी लागली, आज तोच भारत देश जगाला कोरोनाची लस पुरवतोय, है गौरवास्पद असल्याचे पाटील म्हणाले.