अकोळनेरच्या मल्लाकडून दोन मिनिटात पंजाबचा कोहली चितपट!
By अरुण वाघमोडे | Published: April 12, 2023 03:20 PM2023-04-12T15:20:17+5:302023-04-12T15:21:12+5:30
चित्तथरारक झालेल्या या लढतील अवघ्या दोन मिनिटात मंदार याने कोहलीला चितपट करत दोन लाखांच्या बक्षीसासह मानाची गदा पटकाविली.
अहमदनगर : नगर तालुक्यातील अकोळनेर येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या आखाड्यात शेवटची मानाची कुस्ती अकोळनेर येथील मल्ल मंदार मेहेत्रे आणि पंजाब येथील मल्ला लाडी कोहली यांच्यात रंगली. चित्तथरारक झालेल्या या लढतील अवघ्या दोन मिनिटात मंदार याने कोहलीला चितपट करत दोन लाखांच्या बक्षीसासह मानाची गदा पटकाविली.
अकोळनेर येथे तीन दिवस भैरवनाथ यात्रेचे आयोजन सरपंच प्रतिक शेळके यांच्या नेतुत्वाखाली करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या यात्रेत कावडीची मिरवणूक, छाबीना, लोकनाट्य तमाशा, रक्तदान शिबिर, आर्केस्ट्रा असे भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी कुस्त्यांचा आखाडा रंगला. या कुस्त्या पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार निलेश लंके, माजी आमदार शिवाजी कर्डीले, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, सरपंच प्रतिक शेळके आदी उपस्थित होते. दुपारी साडेतीन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत कुस्त्या रंगल्या होत्या. कुस्त्या रोमाचंकारी व निकाली असल्यामुळे प्रेक्षकांची शेवटपर्यंत गर्दी केली होती. यावेळी उपस्थितांनी मल्लांवर बक्षिसांचा वर्षाव केला. शेवटची मानाची कुस्ती प्रेक्षकांनी श्वास रोखून पाहिली. यात मंदारने कोहलीला चितपट केले.