महापालिकेच्या ‘अमृत’चे उदघाटन बारगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:59 AM2018-04-19T11:59:46+5:302018-04-19T12:02:50+5:30
केंद्र शासनाच्या अटल मिशन (अमृत) अंतर्गत शहराच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा करणारी शंभर कोटीच्या पाणी योजनेचे कामही सुरू झाले असून ठेकेदाराला पहिला हप्ताही अदा करण्यात आला आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते योजनेचे उदघाटन करण्याचे सत्ताधाऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. ठाकरे यांना उद्घाटनासाठी येण्याऐवजी केडगावात येण्याची दुर्दैवी वेळ ठाकरे यांच्यावर ओढवली आहे.
अहमदनगर : केंद्र शासनाच्या अटल मिशन (अमृत) अंतर्गत शहराच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा करणारी शंभर कोटीच्या पाणी योजनेचे कामही सुरू झाले असून ठेकेदाराला पहिला हप्ताही अदा करण्यात आला आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते योजनेचे उदघाटन करण्याचे सत्ताधाऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. ठाकरे यांना उद्घाटनासाठी येण्याऐवजी केडगावात येण्याची दुर्दैवी वेळ ठाकरे यांच्यावर ओढवली आहे.
केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहराच्या पाणी पुरवठा यंत्रणेत सुधारणा करणारी शंभर कोटीच्या कामांची निविदा स्थायीने मंजूर केली. त्याचा कार्यारंभ आदेशही ठेकेदाराला देण्यात आला. या योजनेचे उदघाटन करण्यासाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आणण्याचे महापौरांनी नियोजन केले होते. मात्र दोनवेळा त्यांचे हे नियोजन अयशस्वी झाले. आदेश मिळाल्याने ठेकेदाराने कामही सुरू केले आहे. दरम्यान केडगावच्या घटनेत दोन शिवसैनिकांची हत्या झाली. त्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे २५ एप्रिल रोजी येणार आहेत. सेनेच्या पदाधिकाºयांवरही गुन्हा दाखल असल्याने अमृत योजनेच्या उद्घाटनाबाबत सत्ताधारी शिवसेनेने आता विचार सोडून दिला आहे.
‘अमृत’ची दुसरी निविदा लटकली
अमृत योजनेंतर्गत शहरातील भुयारी गटार अंथरण्याची १२८ कोटी आणि वाढीव खर्च ३ कोटी ३१ लाख असलेल्या या योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी मान्यता दिली आहे. प्रशासनानेही सदरचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविला आहे. मात्र ठेकेदार आणि सत्ताधारी यांची बोलणी न झाल्याने हा प्रस्ताव प्रशासन आणि स्थायी समिती यांच्यामध्येच लटकला आहे. केडगाव हत्याकांडानंतर घडलेल्या घडामोडींमुळे सत्ताधारी व्यस्त आहेत.
बोलणी न झाल्याने आणखी किती दिवस प्रस्ताव लटकणार? याबाबत साशंकता आहे. सदस्यांच्या नव्या निवडीमुळे लाभार्थी वाढल्याने सत्ताधा-यांमध्येही पेच निर्माण झाला आहे.
शिवसेनेने काढली हवा
स्थायी समितीमध्ये नव्याने नऊ सदस्यांची नियुक्ती झाली. या नव्या सदस्य नियुक्तीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला की सभापतीची निवडणूक घोषित होईल. विद्यमान सभापती सुवर्णा जाधव यांना डिसेंबर-२०१८ अखेरपर्यंत कालावधी मिळावा, अशी त्यांची इच्छा आहे. तर नऊ-नऊ महिन्यांची बोलणी झाल्याने सभापतीपदासाठी बाबासाहेब वाकळे यांनी व्यूहरचना आखली आहे. मात्र महापौरांनी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव न पाठविता स्वत:कडेच ठेवून भावी सभापतींची हवाच काढून घेतल्याची महापालिकेत चर्चा आहे.