शेवगाव बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 04:36 PM2018-01-28T16:36:17+5:302018-01-29T14:39:19+5:30
शेवगाव येथील बाळासाहेब भारदे विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित २७ व्या अ.भा. बालकुमार साहित्य संमेलन
शेवगाव (बाळासाहेब भारदे साहित्य नागरी) : मुलांनी आपल्यातील कलागुण शोधावा आणि तो सतत जागा ठेवावा. तरच चांगली नवनिर्मिती होईल, असे प्रतिपादन २७ व्या अ.भा. बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ल.म.कडू यांनी केले.
शेवगाव येथील बाळासाहेब भारदे विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित २७ व्या अ.भा. बालकुमार साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मंदार भारदे, स्वागताध्यक्ष हरीश भारदे, डॉ. संगीता बर्वे, बाळासाहेब बुगे, सुनील महाजन, माधव राजगुरू, प्रा. रमेश भारदे, दीपक चव्हाण, गोरक्ष बडे, दिलीप फलके, मीनानाथ देहादराय होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून या संमेलनाचे उद्घाटन झाले.
कडू म्हणाले, बालकुमार साहित्य संमेलन हा आनंदाचा, चांगल्या विचारांचा आणि सर्जनाचा उत्सव आहे. आपण सतत निसर्गाच्या सानिध्यात आणि त्याच्या मर्जीत रहावं. म्हणजे तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपोआप सापडतील, आपण जे अनुभवतो, ते शब्दात मांडणे म्हणजेच साहित्य होय. आपल्या आसपास, आपल्या मनात, रानात आणि जनात सर्वत्र असत, त्याला शोध आणि शब्दांत बांधून ठेवा. वेगवेगळे लेखक वाचून त्यांची शैली समजून घ्या. त्यातूनच आपली स्वत:ची शैली निर्माण होते. आपण सतत लेखन, वाचन आणि मनन केल्यास आपणही चागले लेखक होऊ शकतो. चांगले बालसाहित्य निर्माण होण्यासाठी आधी भाषा सशक्त ठेवायला हवी. तिच्याबद्दल प्रेम आणि आत्मीयता बाळगायला हवी. भाषा जपणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
उद्घाटक मंदार भारदे म्हणाले, लहान मुलांच्या खांद्यावर चांगल्या पुस्तकांची पालखी असणे सर्वांच्या दृष्टीने शुभ लक्षण आहे. साहित्याने बालकांना सकारात्मक विचार आणि समाजभान देणे गरजेचे आहे. कारण रंजनाच्या खांद्यावरच चांगले तत्त्वज्ञान उभे राहते. सध्या विविध वाहिन्यांवर मुलांसाठी चांगल्या मालिका, विविध वृत्तपत्रांमध्ये मुलांसाठी स्वतंत्र जागा असणे आवश्यक आहे. बालसाहित्य लिहिणे ही तशी अवघड गोष्ट आहे. आपल्याकडे मुलांसाठी दर्जेदार चित्रपट आणि साहित्य निर्माण करण्याकडे मोठ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे.
बालनाट्य लेखक, दिग्दर्शक व अभिनेते प्रकाश पारखी व चाइल्ड संस्थेस बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वाघोली येथील भारतीय जैन संस्थेमधील विद्यार्थी दीपक चव्हाण, बालविज्ञान परिषदेत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे बालवैज्ञानिक आकाश शेळके, शिवराज धस, अथर्व जोशी, सुमीत शेळके, कृष्ण मालुरे व मार्गदर्शक अभिषेक जोशी यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. संगीता बर्वे यांच्या ‘मीनूचे मनोगत,’ प्रदीप बोरुडे यांच्या ‘क्षण चिंतनाचे’ (काव्यसंग्रह), ‘कवितेच्या बागेतील गाणी’ (सीडी), ‘झंप्या’ या (व्दैमासिक), एकनाथ आव्हाड यांच्या ‘मला उंच उडू दे’ (नाट्यछटा) यांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. ड
डॉ. संगीता बर्वे यांनी प्रास्ताविक केले. मीनाक्षी कदम यांनी सूत्रसंचालन केले. उमेश घेवरीकर यांनी आभार मानले.