कोपरगावात विकासकामांच्या उद्घाटनाचा फलक फाडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:21 AM2020-12-31T04:21:08+5:302020-12-31T04:21:08+5:30
या विकासकामाच्या भूमिपूजन समारंभाचे फलक अज्ञात व्यक्तीने फाडल्याने बुधवारी (दि. ३०) शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. फलकावर ...
या विकासकामाच्या भूमिपूजन समारंभाचे फलक अज्ञात व्यक्तीने फाडल्याने बुधवारी (दि. ३०) शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. फलकावर आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यासह नगरसेवक व अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यामुळे विरोधकांनीच हे फलक फाडल्याची शंका व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे व शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी घडलेल्या प्रकाराचा निषेध केला आहे. दरम्यान, फलक फाडल्याची माहिती मिळताच शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी आपला फौजफाटा घेऊन तत्काळ घटनास्थळी पोहोचून कार्यकर्त्यांची समजूत काढली. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फिर्याद देण्यास सांगितले होते. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी समजूतदारपणा घेतल्याने तणाव निवळून शहरात शांतता प्रस्थापित झाली होती. दरम्यान, या कामाचे ठेकेदार सलीम अत्तार यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फलक फाडणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तक्रार अर्ज दाखल केला आहे.
...........
ठेकेदार, अधिकाऱ्यावर कारवाई होणार का ?
शासकीय विकासकामाच्या उद्घाटनाचा तसेच कामाची माहिती दर्शविणारा फलक हा शासकीय नियमानुसार लोखंडी, मजबूत, तसेच ऑईलपेंट वापरून लिहिलेला असणे आवश्यक आहे. असे असतानादेखील कोपरगाव येथे शासकीय नियम पायदळी तुडवत कामाच्या उद्घाटनाचा डिजिटल फ्लेक्स लावण्यात आला. त्यात तो अज्ञाताने फाडलादेखील. यातून शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे हा फलक लावणाऱ्या ठेकेदारावर तसेच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणार का ? असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.
.............
फोटो३०- फलक फाडला, कोपरगाव
301220\20201230_141533.jpg
कोपरगाव येथील विकास कामाच्या उद्घाटनाचा फलक अज्ञात व्यक्तीने फाडला.