‘एज्युकेशन फेअर’चे थाटात उद्घाटन

By Admin | Published: May 30, 2014 11:29 PM2014-05-30T23:29:54+5:302014-05-31T00:25:10+5:30

लोकमत एस्पायर २०१४: विश्वासार्हतेने प्रतिसाद

Inauguration of the 'Education Fair' | ‘एज्युकेशन फेअर’चे थाटात उद्घाटन

‘एज्युकेशन फेअर’चे थाटात उद्घाटन

अहमदनगर : इंटरनेट, मोबाईलच्या युगात बसल्या जागेवर आणि क्षणार्धात सर्व माहिती मिळते. तरीही ‘ग्राऊंड रिअ‍ॅलिटी’ काय आहे, याची माहिती व्हावी,यासाठी शैक्षणिक प्रदर्शनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रदर्शन कोणी आयोजित केले, यालाही जास्त महत्त्व आहे. ‘लोकमत’च्या विश्वासार्हतेमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. उत्कृष्ट शिक्षण आणि करिअरला दिशा मिळण्यासाठी तरुणांना या प्रदर्शनाचा निश्चितपणे लाभ होईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी केले. ‘लोकमत’चे संस्थापक श्रद्धेय स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आणि दीपप्रज्वलन करून ‘एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४’ चे उद्घाटन झाले. याप्रसंगी शिंदे बोलत होते. विखे फौंडेशनचे डॉ. बी. सदानंदा, लोकमतचे सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे, आवृत्ती प्रमुख अनंत पाटील यांची व्यासपीठावर उपस्थित होते. लोकमतने आयोजित केलेल्या या शैक्षणिक प्रदर्शनाचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन मुख्य प्रायोजक आहेत. पोलीस अधीक्षक शिंदे म्हणाले, शिक्षण क्षेत्रात खासगीकरणाचे युग आल्यापासून शैक्षणिक क्रांती झाली आहे. मात्र गुणवत्ता राखण्यात अपयश आले. त्यामुळे संस्थांची वाटचाल स्थित्यंतराकडे सुरू झाली. संस्था वाढल्या, विकास झाला. मात्र गुणवत्तेच्या आधारावरच संस्था स्थिर होत आहेत. बारावीनंतर करिअर निवडीची दिशा लोकमतच्या शैक्षणिक मेळाव्यातून मिळेल. बुद्धिमत्ता असूनही योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर विद्यार्थी मागे राहतो. म्हणूनच योग्य दिशा दाखविण्यासाठी शैक्षणिक प्रदर्शनाचे महत्त्व वाढले आहे. डॉ. बी. सदानंदा म्हणाले, सोशल मिडीयामुळे शिक्षणातील मुलांची आवड कमी होत चालली आहे. आवृत्ती प्रमुख अनंत पाटील यांनी प्रास्ताविक करून आयोजनामागील भूमिका विशद केली. विखे फौंडेशनचे प्रा.डॉ. विश्वास पेंडसे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Inauguration of the 'Education Fair'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.