मारहाणीत जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू पारनेर तालुक्यातील घटना : तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 09:17 PM2020-06-11T21:17:20+5:302020-06-11T21:17:33+5:30
सुपा (जि. अहमदनगर) : जातेगाव (ता. पारनेर) येथील मारहाणीत जखमी झालेल्या सेवानिवृत्त जवानाचा उपचारादरम्यान गुरुवारी (दि.११) मृत्यू झाला. सोमवारी (दि.८) त्याला मारहाण झाली होती.
सुपा (जि. अहमदनगर) : जातेगाव (ता. पारनेर) येथील मारहाणीत जखमी झालेल्या सेवानिवृत्त जवानाचा उपचारादरम्यान गुरुवारी (दि.११) मृत्यू झाला. सोमवारी (दि.८) त्याला मारहाण झाली होती. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मनोज संपत औटी (वय ३६, रा. जातेगाव, ता. पारनेर) असे मृत सेवानिवृत्त जवानाचे नाव आहे. याबाबत मयताचा भाऊ तुषार संपत औटी यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सोमवारी (दि.८) सायंकाळी जातेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीजवळ मनोज उभा होता. त्यावेळी तेथे येऊन सौरव गणेश पोटघन, विकी दिनेश पोटघन, अक्षय बापू पोटघन यांनी ‘मुलीचा हात का धरलास’ असे म्हणत मनोज यास लोखंडी पाईप, दगडाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. जखमी मनोजला उपचारासाठी नगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा उपचारादरम्यान गुरुवारी (दि.११) मृत्यू झाला. या प्रकरणी सौरव गणेश पोटघन, विकी दिनेश पोटघन, अक्षय बापू पोटघन (सर्व. रा. जातेगाव, ता. पारनेर) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सेवानिवृत्त जवानाचा मृत्यू झाल्याने गावात तणाव वाढला असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सहा महिन्यापूर्वीच मनोज हा सेवानिवृत्त झाला होता. तिन्ही आरोपी फरार असून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.