घडलं बिघडलं : कमळ चालले, घड्याळालाही अनेकांची चावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 10:45 AM2019-04-25T10:45:04+5:302019-04-25T10:48:19+5:30
नगर लोकसभा मतदारसंघातील मतांचा टक्का यावेळी वाढला. खेडोपाडी चुरशीने मतदान झाले. विजयाचा दावा दोन्ही पक्ष करत असून अंदाज वर्तविणे सर्वांनाच अवघड झाले आहे
अहमदनगर : नगर लोकसभा मतदारसंघातील मतांचा टक्का यावेळी वाढला. खेडोपाडी चुरशीने मतदान झाले. विजयाचा दावा दोन्ही पक्ष करत असून अंदाज वर्तविणे सर्वांनाच अवघड झाले आहे. अनेक मतदारसंघात बऱ्याच राजकीय घडामोडी व सोयरिकी झाल्या आहेत. अनेक ठिकाणी ‘कमळ’ चालले. तशी अनेक ठिकाणी घड्याळालाही चावी मिळाली आहे. त्यामुळे गुलाल कोण घेणार याचा अंदाज वर्तविणे अवघड आहे.
नगर शहर - ‘सेवक’ नेमके कुणासाठी राबले?
नगर शहर हा सेना-भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, गतवेळी येथे राष्टÑवादीचा आमदार निवडून आला. यावेळी शिवसेना-भाजप एकत्र होती. युतीचे अनेक नगरसेवक प्रचारात व्यासपीठावर सक्रिय होते. मात्र, वार्डात त्यांनी फारसे दर्शन दिले नाही. महापालिका निवडणुकीत प्रत्येक उंबºयात चार-पाच वेळा दर्शन देणारे यातील काही ‘सेवक’ या निवडणुकीत मतदाराच्या दारात एकदाही गेले नाहीत. मतदारांऐवजी त्यांनी विखेंना अधिक दर्शन दिले. किती नगरसेवक मनापासून राबले? याबाबत संभ्रम दिसतो.
राष्टÑवादी व दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी नगर शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक प्रचार केला. नगर शहर दोन्ही बाजूकडून तसे दुर्लक्षितच होते. यावेळी नगर शहरात ६०.२५ टक्के मतदान झाले. गतवेळी हे प्रमाण ५५.५६ होते. वाढीव मतदानाचा फायदा कोणाला? यावर येथे मताधिक्याची गणिते ठरतील.
पारनेर - औेटी भारी की लंके ??
पारनेर मतदारसंघात दोन्ही बाजूनेही परिस्थिती फार आलबेल आहे, अशी परिस्थिती दिसत नाही. भाजप-सेना येथे प्रवरेवरुन काय ‘रसद’ येईल यावरच अवलंबून होती. राहुलभैया भाजपसोबत होते. शिवसेनाही प्रवरेच्या यंत्रणेकडेच डोळे लावून होती. राष्ट्रवादीच्या गडात निलेश लंके, सुजित झावरे, उदय शेळके, प्रशांत गायकवाड हे सक्रिय होते. मात्र, भाळवणीत राष्टÑवादीत काही ‘गडबडी’ झाल्याची चर्चा आहे.
पारनेर हा कम्युनिस्टांचा बालेकिल्ला. मात्र, काही कम्युनिस्ट नेत्यांनीही ऐनवेळी कमळाच्या पाकळ्या हातात घेतल्याची चर्चा आहे. निघोज पट्टा हा विखेंचा समर्थक मानला जातो. मात्र, मधल्या काही घडामोडींमुळे येथे अनेकांनी घड्याळाला चावी दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे पारनेरमध्ये नेमके काय होईल हे सांगणे तसे अवघडच. येथे औटी भारी ठरणार की लंके? हे आता ठरेल.
श्रीगोंदा- भीमाकाठी कोण लई भारी ?
श्रीगोंद्यात बबनदादांनी प्रामाणिकपणे भाजप सांभाळली. त्यांच्या जोडीला अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा ही मंडळी होती. राष्ट्रवादीकडे आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस अशी फौज होती. विखेंनी श्रीगोंद्याकडे प्रारंभीपासून लक्ष दिले होते. त्यामुळे या तालुक्यात भाजपलाही चांगले मतदान झाल्याचे वृत्त आहे. संग्राम जगतापांचा मूळ तालुका असल्याने घड्याळही जोमात चालले म्हणतात. दोन्हीही पार्ट्या मताधिक्याचा दावा करत आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून मताधिक्य कोणाला मिळणार? याचा अंदाज बांधणे कठीण आहे. कोणाला किती नवीन गाड्या आल्या? याचीही या मतदारसंघात मोठी चर्चा दिसते.
राहुरी - टोपी फिरली म्हणतात....
राहुरी विधानसभा मतदारसंघात राहुरी व नगर तालुक्यातील काही गावे समाविष्ट आहेत. राहुरी परिसरात विखेंचा संपर्क असल्याने तेथे ‘कमळ’ फुलेल. मात्र, राष्टÑवादीच्या प्राजक्त तनपुरेंनीही तेथे भक्कम तटबंदी करुन घडाळ्याची अधिक पडझड थांबवली म्हणतात. राहुरीत जी नगरची गावे समाविष्ट आहेत तेथे ‘टोपी’ फिरल्याने अखेरच्या दिवशी घड्याळ चालल्याची चर्चा आहे. त्यामुळे राहुरीत ‘कमळ’ तर नगर तालुक्यात ‘घड्याळ’, असे चित्र राहू शकते. यात कमळ पुढे राहिले तरी अपेक्षित आघाडी मिळणार नाही, असे बोलले जाते.
पाथर्डी-शेवगाव - एकीकडे ‘घड्याळ’-दुसरीकडे ‘कमळ’
ऊसतोडणी कामगारांचे आगार असणारा हा मतदारसंघही भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला. पाथर्डीत ‘कमळा’चेच पारडे जड राहील, असा अंदाज आहे. मात्र, कमळाची आघाडी काही प्रमाणात थांबविण्यात राष्टÑवादीला यावेळी यश येईल, अशीही चर्चा आहे. शेवगावचा पट्टा घुले बंधूंनी सांभाळला. शिवाय यावेळी शिवाजीराव काकडे मदतीला होते. त्यामुळे शेवगावमधून राष्टÑवादीला बढत राहील, पण ती पाथर्डीत घटेल असा नेहमीचा अंदाज याहीवेळी आहे.
कर्जत-जामखेड - ‘कमळ’चा पट्टा, पण....
कर्जत-जामखेड हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. पण, यावेळी येथे राष्टÑवादीनेही मुसंडी मारल्याची चर्चा आहे. पालकमंत्र्यांवर तोंडसुख घेणारे सुरेश धस, सुजय विखे हे यावेळी त्यांच्यासोबत दिसले. राष्टÑवादीचे रोहित पवार यांनी या मतदारसंघात बांधणी केली आहे. शिवाय ‘मराठा’ मते राष्टÑवादीमागे एकवटल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री हा गड राखणार की संग्राम यांच्या माध्यमातून रोहित पवार आघाडी मिळविणार? याचा फैसला येथील मतदानयंत्रातून होणार आहे.