आगसखांड येथील घटना : संरक्षणासाठीची बंदूकच चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 06:42 PM2018-03-15T18:42:09+5:302018-03-15T18:42:36+5:30
आगसखांड येथील रहिवासी अॅड. दिनकर सावळेराम पालवे यांच्या राहत्या घरातून बुधवारी (दि.१४) पहाटे अज्ञात चोरट्याने संरक्षणासाठीची परवानाधारक रायफल पळवली. याशिवाय चौदा हजाराचा मुद्देमालही लंपास केला.
पाथर्डी : तालुक्यातील आगसखांड येथील रहिवासी अॅड. दिनकर सावळेराम पालवे यांच्या राहत्या घरातून बुधवारी (दि.१४) पहाटे अज्ञात चोरट्याने संरक्षणासाठीची परवानाधारक रायफल पळवली. याशिवाय चौदा हजाराचा मुद्देमालही लंपास केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी, दिनकर पालवे हे पाथर्डी न्यायालयात वकिली करतात. ते आगसखांड येथे शेतात कुटुंबीयासमवेत राहतात. पालवे हे मंगळवारी घराच्या गच्चीवर झोपले होते. पहाटेच्या सुमारास आगसखांड गावातून पालवे यांना गावात चोर आल्याचे फोनवरून समजले. त्यानंतर पालवे यांनी घराच्या गच्चीवरून इतर लोकांना चोर आल्याचे सांगितले. परंतु पालवे सकाळी तळमजल्यावर आले. त्यानंतर त्यांना गृहउपयोगी सामानाची चोरट्यांनी उचकापाचक केल्याचे दिसले. तसेच दोन हजार रुपये किमतीचे मनगटी घड्याळ, बारा हजार रुपयांची रोकड आणि परवानाधारक रायफल असा ऐवज चोरून नेल्याचे निदर्शनास आले. दरम्यान पालवे यांनी परिसरात शोध घेतला असता अंगणात कापडात गुंडाळून ठेवलेली रायफल सापडली. निवृत्ती भाबड, नितीन गोरक्ष लाड, भगवान रंधवे यांच्याही घरी चोरी झाली. याबाबत पोलिसांनी श्वान पथकामार्फत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात दिनकर पालवे यांनी फिर्याद दाखल केली आहे.