चार एकरात घेतले १८ लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:19 AM2021-04-17T04:19:19+5:302021-04-17T04:19:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोले : तालुक्यातील वीरगाव येथील शेतकरी आनंदराव थोरात आणि रावसाहेब अस्वले यांनी चार एकरांत १८ लाखांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोले : तालुक्यातील वीरगाव येथील शेतकरी आनंदराव थोरात आणि रावसाहेब अस्वले यांनी चार एकरांत १८ लाखांचे कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे.
कमी अवघ्या ६० दिवसांचे कलिंगडाचे भरघोस उत्पन्न त्यांनी घेतले आहे.
चार एकर क्षेत्रात थोरात आणि अस्वले यांनी मॅक्स जातीच्या कलिंगडाची लागवड केली. त्याचा लहान मुलाप्रमाणे सांभाळ केला. वीरगावच्या विश्व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांचे लागवडीपासून ते फळाची तोडणीपर्यंतचे मार्गदर्शन कामी आल्याचे थोरात आणि अस्वले यांनी सांगितले. वीरगाव शिवारात रस्त्याच्या कडेला पिकलेली ही कलिंगडाची शेती प्रत्येकाचे आकर्षण ठरले होते. ६० दिवसांच्या अहोरात्र मेहनतीचे फळ त्यांना लक्ष्मीच्या पावलांनी मिळाले.
चार एकरासाठी उत्पादन खर्च साधारण चार लाखांपर्यंत आला. शेतीची मशागत, शेणखत, २९ हजार रोपांची लागवड, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, रासायनिक खते-औषधे, पिकाची काढणी या सर्व खर्चाचा यात अंतर्भाव आहे. काळ्या कसदार आणि भुसभुशीत जमिनीत सातत्याने ठिबक सिंचनाने झालेल्या पाणीपुरवठ्याने कलिंगडाची शेती अखेरपर्यंत तजेलदार हिरवाईत होती. रावसाहेब अस्वले यांच्याबरोबर त्यांची मुले सुनील अस्वले आणि श्याम अस्वले यांनी परिश्रम घेतले. दोन किलो ते सात किलोपर्यंच्या वजनाची कलिंगडे पिकली. तजेलदार, प्रचंड गोडी असलेली आणि आकर्षक आकारमानाच्या फळांमुळे टाळेबंदीच्या काळातही अनेक व्यापारी सातत्याने शेतीवर खरेेदीसाठी येत होते.
प्रतिकिलो ९ रुपये १० पैसे बाजारभाव कलिंगडाला मिळाला. २०० टनापर्यंतच्या उत्पन्न झाले. यातून १८ लाखांचे उत्पन्न मिळाले. टाळेबंदी नसती, तर मिळालेल्या बाजारभावात ३ रुपये प्रतिकिलोची आधिक वाढ झाली असती, असे आनंदराव थोरात म्हणाले.
....
कलिंगड हे कमी कालावधीचे पीक असल्याने डोळ्यात तेल घालून पहारा करावा लागतो. प्रत्येक दिवशी पिकाचे परीक्षण करून उपाय करावे लागतात. कष्टाची तयारी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उन्हाळ्यात कलिंगडाचे पीक वरदानच ठरले आहे.
- वीरेंद्र थोरात, वीरगाव, ता.अकोले.
...
फोटो