नगर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:21 AM2021-08-01T04:21:05+5:302021-08-01T04:21:05+5:30
केडगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नगर शहरासह जिल्ह्यात विविध निर्बंध लादलेले असताना त्याचे पालन केले जात ...
केडगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नगर शहरासह जिल्ह्यात विविध निर्बंध लादलेले असताना त्याचे पालन केले जात नसल्याने नगर तालुक्यात गावागावांत कोरोनाबाधित रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे तालुका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, दुकानचालक, विविध अस्थापना चालकांवर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
तालुक्यात गेल्या ८-१० दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. काही दिवसांपूर्वी दररोज बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांची ५० च्या खाली आलेली संख्या पुन्हा ५० च्यावर गेली आहे. ही चिंतेची बाब असल्याने तहसीलदार उमेश पाटील यांनी आता कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पोलिसांची विविध पथके तयार करून प्रत्यक्ष कारवाईलाही सुरुवात केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व दुकाने व अस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, तर शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आलेले आहे.
----
२ दिवसांत १०९ जणांवर कारवाई; ३० हजार दंड वसूल
सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेमलेल्या विविध पथकांनी दोन दिवसांत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १०९ जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ३० हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये विनामास्क फिरणे, सोशल डिस्टन्सचे पालन न करणे, मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन, निर्बंध असतानाही दुकाने, आस्थापने सुरू ठेवणे याबाबतच्या कारवायांचा समावेश आहे.
---
मंगल कार्यालय चालकांची बैठक
ग्रामीण भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या निर्बंधांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व मंगल कार्यालय चालक व मालकांची शनिवारी (दि. ३१) पोलीस ठाण्यात बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशाचे पालन सर्वांनी करावे, या नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाईबरोबरच मंगल कार्यालये सील करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा सानप यांनी दिला.
-----
..तर एक महिन्यासाठी दुकान सील
तहसीलदार उमेश पाटील यांनीही ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊनचे, तसेच इतर निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे दुकानदार व नागरिक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच संबंधित दुकान कमीत कमी एक महिन्यासाठी सील करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.