मधमाशांच्या साहाय्याने भुईमूग उत्पादनात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:23 AM2021-05-20T04:23:11+5:302021-05-20T04:23:11+5:30
नेवासा फाटा : मधमाशांच्या साहायाने भुईमूग पिकाच्या उत्पादनात कमालीची वाढ झाली. फुले असलेल्या पिकांची परागसिंचनाच्या दरावर क्षमता अवलंबून असते. ...
नेवासा फाटा : मधमाशांच्या साहायाने भुईमूग पिकाच्या उत्पादनात कमालीची वाढ झाली. फुले असलेल्या पिकांची परागसिंचनाच्या दरावर क्षमता अवलंबून असते. परागसिंचन वाढविण्यासाठी मधमाशांचा वापर अत्यंत उपयोगी ठरतो, अशी माहिती नेवासा तालुक्यातील खुणेगाव येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब काळे यांनी दिली. त्यांनी या माध्यमातून भुईमुगाचे एकरी ४० ते ५० पोती उत्पादन मिळविले आहे.
काळे यांच्या पीक पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे ऊस, कोबी ही पिके सोडून जवळपास सर्वच पिकांमध्ये त्यांनी मधमाशांचे पोळे ठेवलेले आहेत. या तंत्रामुळे जास्त व चांगल्या प्रतीचे उत्पादन निघू शकते, असा त्यांचा अनुभव आहे. मधमाशांच्या वापराविषयी काळे म्हणाले, फुले आल्यावर परागसिंचन होते. नैसर्गिकदृष्ट्या वारा, फुलपाखरे मधमाशांच्या माध्यमातून परागसिंचन होते. माणसांच्या हातात काहीही नसते. उलटपक्षी मधमाशी पालन हा एक लघुउद्योग म्हणून प्रचलित झाला आहे. भुईमुगाच्या पिकात मधमाशांचा वापर करताना एक प्रकारात ५ ते ६ फुले दिसू लागल्यावर मधमाशांच्या पोळ्याच्या दोन पेट्या ठेवल्या. साधारण २७ व्या दिवशी भुईमुगाला फूल येते. मधमाशांच्या माध्यमातून परागसिंचन झाल्यास पुंकेसर व स्त्रीकेसर एकत्र येऊन फळ (शेंग) धारणा होते. एकरी एरवी साधारणत: २० ते २५ पोती शेंगा उत्पादन निघते. मधमाशांच्या मोहळापासून ४ ते ५ फूट अंतरावर गुळपाणी एकत्र करून पसरट भांड्यात ठेवावे. फुले नसताना मधमाशा लांब जाणार नाहीत. भुईमुगाबरोबरच सूर्यफूल, टोमॅटो, टरबूज, भेंडी, वाल, कारले आदी पिकांवरही मधमाशांच्या पालनाचा फायदा झाल्याचे काळे यांनी सांगितले.
कृषी विद्यापीठात इटालियन मधमाशी पालनाद्वारे उत्पादन वाढविण्याचे प्रयोग यशस्वी झाले. परंतु, काळे यांनी गावठी मधमाशांच्याच साहाय्याने आपले उत्पन्न वाढविले आहे.
190521\1945-img-20210519-wa0002.jpg
मधमाशांंची पेटी