पाऊस लांबल्याने टँकर संख्येत वाढ, नगर जिल्ह्यात १६ टँकर
By चंद्रकांत शेळके | Published: June 12, 2023 05:28 PM2023-06-12T17:28:00+5:302023-06-12T17:29:26+5:30
सध्या २७ गावे व १२० वाडीवस्त्यांवरील ४८ हजार ९६७ ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्याने भागत आहे.
अहमदनगर : पाऊस लांबल्याने जिल्ह्यात दिवसेंदिवस टँकरची संख्याही वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील २७ गावे व १२० वाडी-वस्तीवरील ४८ हजार ९६७ लोकांना टँकरने पाणीपुरठा केला जात आहे. पाऊस वेळेत न पडल्यास या महिन्यात टँकरच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते.
मागील वर्षी चांगला पाऊस पडल्याने उन्हाळ्यात टंचाईजन्य स्थिती झाली नाही. परिणामी पाण्याच्या टँकरची संख्याही मर्यादित राहिली. जूनमध्ये पाऊस पडल्यास पाण्याची अडचण येत नाही. परंतु यंदा अर्धा जून महिना लोटला तरी पावसाची चिन्हे दिसेनाशी झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ५० हजार लोकसंख्या थेट टँकरवर आली. तेथे पाणीच नसल्याने टँकर सुरू करावे लागते आहेत.
यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिलपर्यंत एकही टँकर जिल्ह्यात सुरू नव्हता. थेट १८ एप्रिलला संगमनेर व अकोले तालुक्यात एकेक टँकर सुरू झाला. त्यानंतर मे व आता जून महिन्यात हळूहळू टँकरची संख्या वाढून ती सद्यस्थितीत १६ पर्यंत केली आहे. जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर टँकरची संख्या आपोआप कमी होते. परंतु पाऊस लांबल्याने टँकर वाढतच आहेत. याशिवाय पाण्याचे स्त्रोत आटल्याने अनेक ठिकाणच्या पाणीयोजना अडचणीत येण्याची शक्यता आहे.
२७ गावे, १२० वाड्यांना टँकर
जिल्ह्यात सध्या २७ गावे व १२० वाडीवस्त्यांवरील ४८ हजार ९६७ ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्याने भागत आहे. टँकर सुरू असलेली सर्वाधिक १२ गावे पारनेर तालुक्यातील आहेत. त्यानंतर संगमनेर तालुक्यातील ८ गावांना, अकोल्यातील ३ गावांना, तर नगर तालुक्यातील ४ गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे.