नगर तालुक्यात कोविड सेंटरची संख्या वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:22 AM2021-04-01T04:22:22+5:302021-04-01T04:22:22+5:30
केडगाव : नगर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तालुका प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलत तालुक्यात ...
केडगाव : नगर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तालुका प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलत तालुक्यात कोविड सेंटरची संख्या वाढवावी, अशी मागणी नगर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, माजी उपसभापती रेवणनाथ चोभे यांच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार अभिजित बारवकर यांची भेट घेऊन कोरोना उपयोजनांबाबत चर्चा केली.
यावेळी घिगे म्हणाले, नगर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाच्या उपाययोजना कमकुवत ठरत आहेत. शहरातील जिल्हा रुग्णालय व बुथ हॉस्पिटल कोरोना रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. खासगी दवाखान्यातील खर्च गोरगरिबांना परवडत नाही. यामुळे प्रशासनाने प्रत्येक गावात रॅपिड टेस्ट शिबिराचे आयोजन करून बुऱ्हाणनगर, चास, जेऊर, देहरे, वाळकी, रुई, अरणगाव आदी ठिकाणी तालुक्यातील रुग्णांसाठी कोविड सेंटर सुरू करावेत. तेथे व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुरेश सुंबे, अनिल करांडे, बबन आव्हाड उपस्थित होते.