नियमित वीजपुरवठ्यामुळे चिलेखनवाडीच्या प्लांटमधील ऑक्सिजन निर्मितीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:34 AM2021-05-05T04:34:12+5:302021-05-05T04:34:12+5:30

नेवासा : जिल्ह्याला ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या चिलेखनवाडी येथील प्लांटला यापूर्वी भेट दिली होती. तिथे अखंडित वीजपुरवठ्याबाबत काही अडचणी ...

Increase in oxygen production in Chilekhanwadi plant due to regular power supply | नियमित वीजपुरवठ्यामुळे चिलेखनवाडीच्या प्लांटमधील ऑक्सिजन निर्मितीत वाढ

नियमित वीजपुरवठ्यामुळे चिलेखनवाडीच्या प्लांटमधील ऑक्सिजन निर्मितीत वाढ

नेवासा : जिल्ह्याला ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या चिलेखनवाडी येथील प्लांटला यापूर्वी भेट दिली होती. तिथे अखंडित वीजपुरवठ्याबाबत काही अडचणी होत्या. महावितरणच्या नगर येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या सोडविल्या. त्यामुळे आता या प्रकल्पाला मिळणाऱ्या वीजपुरवठ्यात सुधारणा झाली आहे. त्यामुळे दररोज ६० ते ७० सिलिंडरची अधिक निर्मिती होत आहे, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

गडाख यांनी नेवासा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, भेंडा, शिंगणापूर येथील कोविड सेंटर, शनैश्वर देवस्थान ट्रस्ट संचलित शनैश्वर ग्रामीण रुग्णालयातील कोविड उपचार केंद्राला भेटी देऊन आढावा घेतला व तेथील रुग्णांचीही विचारपूस केली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांच्यासमवेत प्रांताधिकारी गणेश पवार, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मोहसीन बागवान, तालुका आरोग्य अधिकारी अभिजित सूर्यवंशी, गटविकास अधिकारी शेखर शेलार, मुख्याधिकारी समीर शेख, पोलीस निरीक्षक विजय करे, पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, बाजार समितीचे सभापती डॉ. शिवाजी शिंदे, शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.

ऑक्सिजन सिलिंडर आणि रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली होत असल्याने त्याबाबत आपण जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील सर्वच कोविड सेंटरमध्ये असणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात या सुविधा पुरेशा व वेळेवर उपलब्ध करण्याबाबत सूचना दिल्याचे गडाख यांनी सांगितले.

शनैश्वर ग्रामीण रुग्णालयातील सर्व स्टाफ कोविड केंद्रात राबत असून, तालुक्यातील कोविड सेंटरच्या मदतीसाठी कमी पडणाऱ्या स्टाफची मागणी केली होती. त्यापैकी डॉक्टर्स मिळाले असून, १४ नर्सेस आणि वॉर्डबॉय लवकरच उपलब्ध होणार आहेत. तशा सूचना आजच्या आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे गडाख यांनी सांगितले.

---

शिक्षक संघटना देणार पाच लाखाची मदत..

तालुक्यातील वाढत असणाऱ्या कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघटनाही पुढे सरसावली आहे. कोविड रुग्णांच्या सोयी-सुविधांसाठी संघटनेने पाच लाख रुपयांची मदत देण्याचे मान्य केले असल्याचे सांगून मंत्री गडाख यांनी या मदतीबद्दल संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व शिक्षकांचे आभार मानले.

---

०३ नेवासा गडाख

शनिशिंगणापूर येथे आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करताना मंत्री शंकरराव गडाख.

Web Title: Increase in oxygen production in Chilekhanwadi plant due to regular power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.