अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वाहतूक खर्चात वाढ; तोटा वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:50 PM2020-02-26T12:50:47+5:302020-02-26T12:51:57+5:30
जिल्ह्यातील साखर उद्योगासाठी चालू हंगाम अत्यंत आव्हानात्मक ठरला आहे. सरासरी अवघ्या ९० दिवसांचे गाळप करताना कारखान्यांची दमछाक झाली आहे. कार्यक्षेत्रात ऊस नसल्याने अनेक कारखान्यांना अडीचशे किलोमीटर अंतरावरील पंढरपूर व नंदूरबार येथून गाळपासाठी ऊस आणावा लागला. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होऊन आर्थिक फटका बसला.
शिवाजी पवार ।
श्रीरामपूर : जिल्ह्यातील साखर उद्योगासाठी चालू हंगाम अत्यंत आव्हानात्मक ठरला आहे. सरासरी अवघ्या ९० दिवसांचे गाळप करताना कारखान्यांची दमछाक झाली आहे. कार्यक्षेत्रात ऊस नसल्याने अनेक कारखान्यांना अडीचशे किलोमीटर अंतरावरील पंढरपूर व नंदूरबार येथून गाळपासाठी ऊस आणावा लागला. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होऊन आर्थिक फटका बसला.
साखर कारखानदारीसाठी १८० दिवसांचा हंगाम हा आर्थिकदृष्ट्या उत्तम मानला जातो. मात्र नगर जिल्ह्यात उसाच्या कमतरतेमुळे हंगाम सरासरी ९० दिवस चालला. जिल्ह्यातील गणेश, राहुरी, साईकृपा, श्रीगोंदे, कुकडी व पारनेर हे साखर कारखाने बंद ठेवण्याचा तेथील व्यवस्थापनाने निर्णय घेतला होता. खासगी व सहकारी अशा १३ कारखान्यांचे धुराडे पेटले होते. त्यातील ज्ञानेश्वर, मुळा व वृद्धेश्वर साखर कारखान्यांचे गाळप फेब्रुवारीच्या प्रारंभी बंद झाले. सध्या दहा कारखान्यांचा हंगाम सुरू असून मार्चच्या पंधरवाड्यापर्यंत सर्वच धुराडे बंद होतील.
जिल्ह्यातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अल्प प्रमाणात ऊस उपलब्ध होता. त्यामुळे सर्वच कारखान्यांना ऊस मिळविण्यासाठी कसरत करावी लागली. अशोक साखर कारखान्याने यंदा धुळे जिल्ह्यातून ऊस उपलब्ध केला. याशिवाय संगमनेर, प्रवरा या कारखान्यांना जिल्ह्याबाहेर पडावे लागले. पंढरपूर, करमाळा, शिरपूर, जळगाव, जालना, नंदूरबार या भागातून त्यांनी ऊस आणला. त्यामुळे वाहतूक खर्च व पर्यायाने उत्पादन खर्च वाढला आहे. कारखाने कमी क्षमतेने चालवावे लागले. त्यातच साखरेचे दर वाढलेले नसल्याने तोट्यात वाढ होईल असा जाणकारांचा अंदाज आहे. कारखान्यांच्या अपुºया हंगामामुळे सहवीजनिर्मिती प्रकल्प, इथेनॉल निर्मितीसह व इतर उपपदार्थ निर्मितीवर विपरित परिणाम होणार आहे.
नगर जिल्ह्यात यंदा ४७ ते ५० लाख टन उसाचे गाळप होईल असा अंदाज आहे. साखर उतारा सरासरी १० टक्क्यांच्या आसपास राहील. सर्वच कारखान्यांसाठी हा कसोटीचा हंगाम ठरला आहे.
पूर्ण क्षमतेने कारखाने चालले नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढणार आहेत, असे अशोक सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी सांगितले.