वर्षापासून वाढतोय मानसिक ताण; जगायचे कसे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:20 AM2021-05-09T04:20:52+5:302021-05-09T04:20:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनामुळे सतत बाजारपेठा बंद राहात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनामुळे सतत बाजारपेठा बंद राहात आहेत. त्यामुळे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला योग्य बाजारपेठ व योग्य भाव मिळत नाही. अनेकांच्या नोकऱ्या तसेच रोजगार गेल्याने आर्थिक विवंचनेतून मानसिक तणाव वाढला आहे. त्यामुळे जगायचे कसे? असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे.
गतवर्षी सुरुवातीलाच देशाच्या राजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दिवसागणिक रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातून देशाचे चाक थांबले होते. त्यानंतर हे लॉकडाऊन जसजसे वाढत गेले तसतसे सर्वांचेच आर्थिक गणित बिघडत गेले. यात अनेकांचे व्यवसाय गेले, नोकऱ्या गेल्या, शेती व्यवसाय कोलमडले, रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांचे काम गेले. गेल्या वर्षातून सावरत असतानाच पुन्हा यावर्षी ३ एप्रिलपासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे पुन्हा तेच झटके, चटके बसू लागले. या महामारीचा तसा सर्व वयोगटातील महिला - पुरुषांवर परिणाम झाला आहे. याच अडचणीच्या काळात कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या लाखो रुपयांचे नियोजन करतानाही नाकीनऊ येत आहेत. त्यातून अनेकांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची वेळ येत आहे.
................
आर्थिक अडचणीमुळे नैराश्य...
मानसिक ताणाची सर्वाधिक संख्या ही तरुणाईची आहे. कारण ऐन उमेदीच्या काळातील भविष्यातील नियोजनाचे दोन वर्ष हातून निसटून चालले आहे. मनासारखे काहीच करता येत नाही. हातची नोकरी गेली, व्यवसाय सुरु केला तर या महामारीत प्रतिसाद मिळत नाही. शेतीत लाखो रुपये खर्च करून, काबाडकष्ट करून उत्पादित शेतमालाला भाव मिळत नाही, अशा एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातून भासणाऱ्या आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाच्या गरजा भागवायच्या कशा? प्रसंगी यातून नैराश्यदेखील येत आहे.
...............
नोकरी गेली, आता काय करू
कोरोनाचा थेट अर्थकारणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाले. यात अनेकांना आपल्या हक्काच्या नोकरीला मुकावे लागले. दुसरी नोकरी मागूनही मिळत नाही. त्यामुळे नोकरी गेली, आता काय करू? स्वतःसह कुटुंबाच्या गरजा कशा पूर्ण कराव्या, अशा विवंचनेने अनेकांना ग्रासले आहे.
...........
कोरोना महामारीचा सुरळीत चाललेल्या जनजीवनावर, अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. यातून अनेकांना अनपेक्षित धक्के बसले आहेत. त्यामुळे तणाव वाढला आहे. अशी गेल्या वर्षापासून अनेक रुग्णांची तपासणी केली. मात्र, सद्यस्थितीत कोरोना या संकटाला कोणी जा म्हटल्याने जाणार नाही. त्यासाठी आपल्याला त्याच्याबरोबर जगायचे आहे. त्यासाठी त्याच्याशी व त्याच्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक व मानसिक परिस्थितीला तोंड देत मात करायची आहे. त्याकरिता खचून न जाता मनस्थिती स्थिर ठेवून, गरजा कमी करून सकारात्मक विचार करून लढावे लागणार आहे. तसेच कोरोना संदर्भातील शासनाचे सर्व नियम पाळणेदेखील महत्त्वाचे आहे. त्यातून निश्चित मानसिक तणाव कमी होईल.
- डॉ. सुनील उंडे, मानसोपचार तज्ज्ञ, श्रीरामपूर