भरमसाठ वाढविलेली पाणीपट्टी कमी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:50 AM2021-01-13T04:50:13+5:302021-01-13T04:50:13+5:30
कोपरगाव : पाटबंधारे विभागाने दोनही कालव्यांच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी चालू वर्षात भरमसाठ वाढविलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ...
कोपरगाव : पाटबंधारे विभागाने दोनही कालव्यांच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी चालू वर्षात भरमसाठ वाढविलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कमालीचा अडचणीत असताना अशा पद्धतीची दरवाढ योग्य नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने २०१८ प्रमाणेच पाणीपट्टी आकारावी, अशी मागणी शिवसेनेचे नेते नितीन औताडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पाणी देताना अडीच किलोमीटरची मर्यादा असल्याने मिळणाऱ्या पाण्यापासून बरेच शेतकरी वंचित राहतात. २००५ साली समन्यायी पाणी वाटप कायदा झाला आणि नाशिक, नगर ते हक्काचे पाणी औरंगाबादला गेले. परंतु, यावर्षी धरण पाणलोट क्षेत्रासह कालव्यांच्या लाभक्षेत्रातील सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. सध्याची पाण्याची परिस्थिती चांगली असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीत केलेली वाढ खूप अन्यायकारक आहे. अतिवृष्टी व खरीप पिकांच्या नुकसानीने शेतकरी आधीच हवालदिल झालेला आहे. मार्च २०२०पासून देशासह महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. कांदा, मका, भाजीपाला़ डाळिंब, द्राक्षे आदी फळबागांची खरेदी व्यवस्था कोलमडल्याने पिकासाठी केलेला खर्चही शेतकऱ्यांच्या हातात मिळाला नाही. वाढत्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना भाजीपाल्याच्या पिकावर नांगर फिरवावा लागला. अजूनही कोरोनामुळे परिस्थिती सुधारलेली नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याची आवश्यकता आहे, असेही औताडे यांनी म्हटले आहे.