उत्पन्न वाढविण्यावर नव्या उपायुक्तांचा भर
By Admin | Published: August 30, 2014 11:11 PM2014-08-30T23:11:28+5:302014-08-30T23:21:01+5:30
नव्याने उपायुक्त म्हणून रुजु झालेले अजय चारठाणकर यांनी धोरणात्मक निर्णय घेण्याचा निश्चय केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
अहमदनगर: आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर असलेल्या महापालिकेला बळकटी आणण्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणे गरजेचे आहे. अभ्यासाअंती हे स्पष्ट झाल्यानंतर नव्याने उपायुक्त म्हणून रुजु झालेले अजय चारठाणकर यांनी धोरणात्मक निर्णय घेण्याचा निश्चय केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
गत आठवड्यातच चारठाणकर यांची नगर महापालिकेत उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली. पहिल्या आठवड्यात त्यांनी विभागवार महापालिकेची माहिती घेतली. त्यानंतर त्यांना आर्थिक डोलारा डळमळीत असल्याचे दिसले. उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी त्यांनी मागणी व वसुलीची गोळाबेरीज चेक केली. शहरात ७ हजार ५०० व्यापाऱ्यांनी एलबीटीसाठी नोंदणी केली आहे. मात्र त्यातील सुमारे ४ हजार व्यापारी एलबीटी भरतात. अन्य व्यापारी हे छोटे असून ते स्थानिक व्यापाऱ्यांकडून माल घेतात. त्यामुळे दरमहा सरासरी सव्वातीन कोटी रूपये एलबीटीच्या रुपाने जमा होतात. एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी तयार करा असे निर्देश चारठाणकर यांनी एलबीटी वसुली विभागास दिले.
आरोग्य विभागाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची स्थिती बदलण्याची गरज असल्याचे बोलून दाखविले. तसेच दवाखान्यात तज्ज्ञ डॉक्टरांची भेट असावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. प्रत्यक्षात हॉस्पिटल पण नोंदणी मात्र क्लिनीक असलेल्यांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाईसाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.
चारठाणकर यांचा एकु णच कार्यभार पाहता महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यावर त्यांचा भर असल्याचे दिसले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिस्त व नियमानुसार कामकाज करण्याकडे त्यांचे लक्ष आहे. चारठाणकर यांनी नगरपालिका, महापालिकांत २१ वर्षे सेवा केल्याने त्यांना कामाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळेच ते नगरला शिस्त लावतील असे बोलले जाते. पण नव्याचे नऊ दिवस हा अनुभव नगरकरांना काही नवा नाही. त्यामुळे चारठाणकर असेच राहतात की कालानुरूप बदलतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)