छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी अहमदनगरमध्ये बेमुदत उपोषण
By साहेबराव नरसाळे | Published: April 28, 2023 05:45 PM2023-04-28T17:45:28+5:302023-04-28T17:45:57+5:30
छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी अहमदनगरमध्ये बेमुदत उपोषण.
अहमदनगर : शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याकरिता चौथऱ्याच्या कामाची ई- निविदा प्रक्रिया झालेली असतानाही प्रशासनामध्ये त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुतळा उभारण्याच्या कामासाठी विलंब झाला आहे, असा आरोप करीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कृती समितीच्या वतीने शुक्रवारी बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणार आहे. मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हे काम अद्याप सुरू झाले नाही. मनपा प्रशासनाच्या वतीने जोपर्यंत ठोस उपाययोजना होत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहील, असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला. छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याबाबत मनपा प्रशासनाला वारंवार निवेदन देवूनही कोणतीही उपाययोजना झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या कामाला मनपा प्रशासन सुरुवात करत नाही तोपर्यंत स्मारक कृती समिती बेमुदत उपोषणावर ठाम आहे, असे उपोषणात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांनी सांगितले.