नेप्ती उपबाजारात बेमुदत कांदा लिलाव बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:22 AM2021-09-03T04:22:27+5:302021-09-03T04:22:27+5:30
केडगाव : स्व. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार आवारामध्ये माल वाहतूकदार व खरेदीदार यांच्यामधील वाराई ...
केडगाव : स्व. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार आवारामध्ये माल वाहतूकदार व खरेदीदार यांच्यामधील वाराई हमाली संदर्भात चर्चा करूनही वाद न मिटल्याने शनिवार (दि.४) पासून पुढील निर्णय होईपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवणार असल्याचे जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार शिकरे यांनी कळविले. शेतकऱ्यांनी आपला कांदा नेप्ती उपबाजार समिती येथे विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी केले आहे.
दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारामध्ये सोमवार, गुरुवार, शनिवार या दिवशी कांदा लिलाव होतात. नगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांसह आष्टी, शिरूर या भागातील शेतकरी ही मोठ्या प्रमाणात कांदा आणतात. गुरुवारी सुमारे ४५ हजार गोणी कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता. सकाळी १० वाजता लिलावाला सुरुवात होणे आवश्यक होते. पण ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि व्यापारी यांच्यात वाराईच्या मुद्यावरून वाद झाल्याने ट्रान्सपोर्ट असोसिएशनने कांदा नेला जाणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू केले नाही. या दोघांच्या वादात लिलाव सुरू न झाल्याने दुपारनंतर शेतकरी संतप्त झाले. त्यांनी समोरच्या बाह्य वळण रस्त्यावर आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनात शिवसेना जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी सहभाग घेतला. त्यानंतर बाजार समितीचे गेट बंद करण्याचा प्रयत्न झाला. बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, सचिव अभय भिसे यांसह सर्व पदाधिकारी यांनी व्यापारी आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्यात मध्यस्थी केल्याने वाद मिटला व दुपारी साडे ३ नंतर गुरुवारसाठीचे लिलाव पूर्ण करण्यात आले. परंतु पुढील लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
......................
शिवसेना शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. शेतकऱ्यांनी लिलाव चालू करावे, यासाठी रस्त्यावर आंदोलन केले. मी आल्यावर रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा गेटवर आंदोलन करू, असे सांगितले. हे समजल्यावर मिटिंग अर्धवट सोडून संचालक गेटवर आले. व्यापारी व ट्रान्सपोर्ट याचा विषय मिटला असून लिलाव सुरळीत चालू झाले, असे त्यांनी आंदोलन करणाऱ्यांना सांगितले.
-संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य
..................
कांदा व्यापारी व ट्रान्सपोर्ट संघटना याची वाराई या विषयाचा वाद झाला. याबाबत दोघांनी ताठर भूमिका घेतली. याबाबत या दोघांची तातडीने बैठक घेऊन मार्ग काढला व कांदा लिलाव सुरळीत चालू केले. बाजार समितीने आत्तापर्यंत शेतकरी हिताचेच निर्णय घेतले आहेत. यामध्ये कोणीही राजकारण आणू नये.
-अभिलाष घिगे, सभापती
..........
वाहतूक संघटनेने अचानक ज्याचा माल त्याचा हमाल अशी मागणी केली. राज्यात कोणीच हा निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांचा माल नाशवंत असतो. त्याची त्वरित वाहतूक करणे अपेक्षित आहे. मात्र वाहतूक संघटनेने वाहन उपलब्ध न करण्याचे धोरण घेतले.
-नंदकुमार शिकरे, अध्यक्ष, व्यापारी संघटना