वृद्धांसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र विभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:55 PM2019-03-28T12:55:16+5:302019-03-28T12:56:03+5:30
‘म्हातारपण आजारांचे ग्रहण’ असं म्हटलं जातं़ वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी मोठा खर्चही येतो़ त्यात वृद्धांना मेडिक्लेम पॉलिसीही नाकारल्या जातात़
साहेबराव नरसाळे
अहमदनगर : ‘म्हातारपण आजारांचे ग्रहण’ असं म्हटलं जातं़ वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी मोठा खर्चही येतो़ त्यात वृद्धांना मेडिक्लेम पॉलिसीही नाकारल्या जातात़ त्यामुळे अनेक वृद्धांना उपचार घेणेही दुरापास्त होते़ या वृद्धांना विनाकटकट व मोफत उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र आयुष विभाग उभारण्यात आला असून, गुरुवारपासून त्याची अंमलबजावणी सुरु होणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ प्रदीप मुरंबीकर यांनी दिली़
राष्ट्रीय आयुष मिशनअंतर्गत जिल्हा रुग्णालयात वृद्धांसाठी स्वतंत्र सेंटर उभारण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या होत्या़ त्यानुसार जिल्हा रुग्णालयात हे आयुष सेंटर सुरु करण्यात आले आहे़ जिल्हा रुग्णालयातील आयुष विभागात दर मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी १२़३० वाजेपर्यंत वृद्धांना आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत़ आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व योग उपचार पद्धतीने वृद्धांना आरोग्य सेवा दिली जाणार आहे़ आयुर्वेदीय पद्धतीने वृद्धांची प्रकृती परीक्षण करुन त्यानुसार उपचार व आरोग्य सल्लाही दिला जाणार नाही़ वृद्धांमध्ये मधुमेहाचे प्रमाणही जास्त असते़ त्यामुळे मधुमेहावरील उपचार व त्यांना विशेष मार्गदर्शनही देण्यात येणार आहे़ वृद्धत्व काळात दुसरा एक महत्वाचा आजार म्हणजे सांधेदुखी़ या सांधेदुखी टाळण्यासाठी कोणत्या प्रकारचे व्यायाम करावेत, काय काळजी घ्यावी असे मार्गदर्शन करुन वृद्धांच्या सांधेदुखीवर उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ़ शौनक मिरीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
मानसिक रुग्णांना समुपदेशन
वृद्ध व्यक्तींमध्ये मानसिक आजारांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे़ मानसिक प्रकृती खालावल्यामुळे अनेक औषधेही लागू पडत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे़ अशा मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या वृद्धांना मानसशास्त्रीय उपचार आणि समुपदेशन जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत़
जिल्हा रुग्णालयात सर्जनची वाणवा
जिल्हा रुग्णालयात विविध आजारांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्ण येतात़ वृद्धांच्याही अनेक आजारांवर शस्त्रक्रियेची गरज असते़ मात्र, जिल्हा रुग्णालयात सर्जनची दोन्ही पदे रिक्त असल्यामुळे शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना सरळ बाहेरचा रस्ता धरावा लागतो़ त्याशिवाय वर्ग एकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची २८ पदे तर वर्ग दोनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची ४ पदे रिक्त आहेत़ ही रिक्त पदे भरावीत, अशी मागणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ मुरंबीकर यांनी शासनाकडे वारंवार केली आहे़ मात्र, ही पदे भरली जात नाहीत़