भारत गेला चंद्रावर, आम्ही मात्र चिखलावर; रस्त्यासाठी संतप्त नागरिकांनी रोखला रस्ता

By अरुण वाघमोडे | Published: September 13, 2023 04:57 PM2023-09-13T16:57:34+5:302023-09-13T16:58:58+5:30

घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने व रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे.

India went to the moon but we went to the mud; Angry citizens blocked the road for the road | भारत गेला चंद्रावर, आम्ही मात्र चिखलावर; रस्त्यासाठी संतप्त नागरिकांनी रोखला रस्ता

भारत गेला चंद्रावर, आम्ही मात्र चिखलावर; रस्त्यासाठी संतप्त नागरिकांनी रोखला रस्ता

अहमदनगर: मागील सात महिन्यापासून खोदून ठेवलेल्या रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्याने नगर शहरातील बोल्हेगाव येथील नागरिकांनी बुधवारी (दि.13 ) सकाळी नगर-मनमाड महामार्गावर तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात स्वयंफूर्तीने महिला, युवक-युवती, सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारत गेला चंद्रावर आम्ही मात्र चिखलावर... अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला.

बोल्हेगाव येथील गणेश चौकात सर्व महिला व नागरिक एकत्र येवून मोर्चाने नगर-मनमाड रस्त्यावर आले. सकाळी 10:30 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलकांनी महापालिकेच्या निष्क्रियते विरोधात जोरदार निदर्शने केली. महापालिका आयुक्त येत नाही, तो पर्यंत रस्त्यावरुन न हटण्याचा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला होता. सात महिन्यांपूर्वी महापालिकेच्या वतीने गणेश चौक ते केशव कॉर्नर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. कामासाठी रस्ता पूर्ण खोदल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी साचून नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने व रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे आंदोलन, निवेदन व पाठपुरावा करून देखील सदर रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आलेले नाही. 31 मे पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नागरिकांना आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र मुदत संपून तीन महिने उलटूनही रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याने स्थानिक नागरिकांना रास्ता रोकोचा आक्रमक पवित्रा घेतला होता.

पोलीस प्रशासनाने आंदोलकांची समजूत काढून रस्ता मोकळा करण्याच्या सूचना केल्या, मात्र आंदोलकांनी आयुक्त आल्याशिवाय रस्त्यावरून हटणार नसल्याचे स्पष्ट केले. शेवटी मनपावे उपायुक्त श्रीनिवास कुऱ्हे आंदोलन स्थळी हजर झाले.आज दुपारपासूनच कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले. प्राधान्याने पाईपलाइन शिफ्टिंग करून काम सुरू होणार असल्याचे स्पष्ट केल्याने रास्ता रोको आंदोलन 12 वाजता मागे घेण्यात आले.

Web Title: India went to the moon but we went to the mud; Angry citizens blocked the road for the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.