ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाबाबत उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:19 AM2021-03-28T04:19:43+5:302021-03-28T04:19:43+5:30
दहिगावने : ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाबाबत प्रचंड उदासीनता दिसून येत आहे. शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या ...
दहिगावने : ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाबाबत प्रचंड उदासीनता दिसून येत आहे. शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या दीड महिन्यात ८६९ नागरिकांनीच कोरोनाची लस घेतल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांनी दिली.
येथील कोरोना लसीकरणाचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या हस्ते १७ फेब्रुवारी रोजी करण्यात आला होता. या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांनी लसीकरणाबाबत नागरिकांना माहिती दिली होती.
आरोग्य केंद्रात लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांचे कोरोना लसीकरण सुरू आहे. आरोग्य केंद्रांतर्गत शहरटाकळी, दहिगावने, भावीनिमगाव, रांजणी, मठाचीवाडी, ढोरसडे, अंत्रेसह १४ गावे असून ३ उपकेंद्रे आहेत. या गावांची लोकसंख्या ३२ हजार ७६२ एवढी आहे. साधारणपणे एकूण लोकसंख्येच्या १० टक्के ज्येष्ठ नागरिक असतात. म्हणजे येथे ३ हजार २७६ एवढी ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. त्यात ४५ वर्षांवरील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांची संख्या तितकीच असू शकते. त्यामुळे अंदाजे ६ हजार ५०० नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी केवळ ८६९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ही संख्या फारच कमी असून लसीकरणासाठी नागरिकांमध्ये उदासीनता असल्याचे स्पष्ट करणारी आहे.
ग्रामीण भागातील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिकांकडे अँड्रॉइड मोबाइल नाहीत. त्यामुळे फेसबुक, व्हाॅट्सॲप यांसारख्या सोशल ॲप्सद्वारे प्रसारित होणारी माहिती त्यांच्यापर्यंत थेट पोहोचत नाही. शिवाय लसीकरणासाठी ऑनलाइन नावनोंदणीबाबत ज्येष्ठांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यामुळे प्रशासनाने जनजागृतीचे काम अधिक व्यापक करणे आवश्यक आहे.
--
कोरोना लस सरकारी दवाखान्यात मोफत असून पूर्णतः सुरक्षित आहे. ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरणाबाबत वेगवेगळ्या माध्यमांतून प्रशासन आवाहन करत आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने एक जाबाबदारी समजून कोरोना लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक घरातील तरुणांनी आपल्या घरातील ज्येष्ठांची कोरोना लसीकरणासाठी ऑनलाइन नावनोंदणी करण्यास पुढाकार घ्यावा.
- डॉ. क्षितिज घुले,
सभापती, पंचायत समिती, शेवगाव