स्वदेशी चळवळ ते स्टायलिश युग.... खादीची क्रेझ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 10:19 AM2019-10-02T10:19:37+5:302019-10-02T10:20:50+5:30
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधीजींच्या स्वदेशी चळवळीचे प्रतीक ठरलेल्या खादी कपड्यांची क्रेझ आजही कायम आहे़ राजकीय नेत्यांसह तरुण अन् इतर सर्वसामान्य नागरिकही खादीचे चाहते आहेत़ काळाच्या ओघात फॅशनेबल झालेला हा खादी ब्रॅण्ड भारतीय वस्त्रपरिधान परंपरेचा अविभाज्य घटक बनल्याचे दिसत आहे़
गांधी जयंती विशेष / अरुण वाघमोडे ।
अहमदनगर : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधीजींच्या स्वदेशी चळवळीचे प्रतीक ठरलेल्या खादी कपड्यांची क्रेझ आजही कायम आहे़ राजकीय नेत्यांसह तरुण अन् इतर सर्वसामान्य नागरिकही खादीचे चाहते आहेत़ काळाच्या ओघात फॅशनेबल झालेला हा खादी ब्रॅण्ड भारतीय वस्त्रपरिधान परंपरेचा अविभाज्य घटक बनल्याचे दिसत आहे़
सध्या विधानसभेचा निवडणूक काळ असल्याने राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून खादीच्या कपड्यांना मोठी मागणी वाढल्याचे नगर शहरातील विक्रेत्यांनी सांगितले़ एकेकाळी केवळ कापडामध्ये मिळणारी खादी आता रेडिमेड कपड्यांमध्ये उपलब्ध झाली आहे़ खादी कपड्यांमधील झब्बा आणि शबनम हे स्वरुप बदलून आता विविध रंगातील आकर्षक बॅग्ज, साड्या, ड्रेस मटेरिअल, दुपट्टे, चुडीदार, लेहंगा, शॉटर््स, पलाझो हे स्त्रियांसाठी तर कुर्ता, जॅकेट्स, ब्लेझर्स, झब्बा, शर्टस, पँटस हे पुरुषांसाठी उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठीही खादीचे विविध कपडे उपलब्ध आहेत़ कॉलेज तरुण, तरुणींमध्येही खादीपासून तयार केलेला कुर्ता आणि त्यावर जॅकेट परिधान करण्याची मोठी फॅशन आहे़ या कपड्यांसह खादीमध्ये टॉवेल, ब्लँकेटस्, नॅपकिन अशा इतर कपड्यांनाही ग्राहकांकडून मोठी पसंती मिळते़
खादीसोबत इतर धाग्यांना वापरून त्यातून रॉ सिल्क खादी, मटका खादी, पॉली खादी, टसर सिल्क असे खादीचे प्रकार तयार झाले आहेत़ त्यातून वेगवेगळे कपडे तयार होऊ लागले. पूर्वी केवळ प्लेन खादी मिळत असे. आता त्यात अनेक प्रिंट्स उपलब्ध होत आहेत. सध्या खादीचे कापड १०० ते ७०० रुपये प्रती मीटर विकले जाते़ पांढ-या कपड्यांपेक्षा रंगीत आणि डिझाईनचे कापड महाग आहे़ रेडिमेडमध्ये शर्ट २०० रुपयांपासून ते १२०० रुपये तर जॅकेट ३०० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत मिळते.
नेहरु कुर्ता ते मोदी जॅकेटमुळे खादीला अच्छे दिन
स्वातंत्र्याच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरु खादीच्या कपड्यांपासून तयार केलेला कुर्ता परिधान करायचे. पुढे या कुर्त्याचे नेहरु कुर्ता असे नामकरण झाले़ हा कुर्ता आजही प्रचंड लोकप्रिय आहे़ पुढे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे खादीपासून तयार केलेले जॅकेट परिधान करत होते़ या जॅकेटला त्या काळी मिनिस्टर जॅकेट अशी ओळख मिळाली़ हे जॅकेट घालणाºयांची संख्या मोठी वाढली़ असेच जॅकेट पंतप्रधान नरेंद्र मोदीही वापरतात़ या जॅकेटला आता मोदी जॅकेट अशी ओळख मिळाली आहे़ खादीपासून तयार केल्या जाणा-या या जॅकेटला गेल्या पाच वर्षापासून मोठी मागणी आहे़ काळाच्या ओघातही खादीचे अच्छे दिन कायम आहेत़
खादी कापडापासून तयार केलेले विविध कपडे बाजारात उपलब्ध आहेत़ काळाच्या ओघात या कपड्यांची मागणी घटलेली नसून वाढलेली आहे़ पुरुषांसह महिलाही खादीचे कपडे खरेदी करतात़ खादीचे कपडे खरेदी करण्यासाठी नगर शहरात जिल्हाभरातून ग्राहक येतात़, असे महाराष्ट्र खादी भांडारचे व्यवस्थापक राजू गौतम यांनी सांगितले.