अकोलेत बहरला इंडोनेशियाचा निळा भात; राज्यातील पहिला प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 02:26 AM2020-09-06T02:26:03+5:302020-09-06T02:26:28+5:30
दहा एकर क्षेत्रावर केली लागवड
- मच्छिंद्र देशमुख
अहमदनगर : अकोले तालुक्याच्या कृषी विविधतेत आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. गर्द निळ्या रंगाचा इंडोनेशियातील तांदूळ अकोले तालुक्यातील आदिवासी खेड्यांमध्ये बहरला आहे. यंदा ही लागवड दहा एकरावर वाढली आहे. निळ्या भात लागवडीचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
अकोले तालुक्यातील मेहंदुरी येथील प्रयोगशील शेतकरी विकास देवराम आरोटे हे मागील वर्षी कोलकाता येथे झेंडूची रोपे आणण्यासाठी गेले होते. तेथे त्यांना निळा व काळा असे भाताचे दोन प्रकार दिसले. त्यातील त्यांनी ३ किलो निळा वाण सोबत आणला. या तीन किलो तांदळाची रोपे तयार करुन त्यांनी गेल्या वर्षी मेहंदुरी येथे ५ गुंठे क्षेत्रात या रोपांची लागवड केली. त्यापासून २00 किलो बियाणे तयार झाले.
यंदा धामणवन आणि शिरपुंजे येथील २0 शेतकऱ्यांच्या शेतात लागवड केली. सध्या या भाताची जोमदार वाढ झाली आहे. मेहंदुरीत आरोटे यांच्या शेतात वीस गुंठे क्षेत्रातील भात ओंब्या येण्याच्या अवस्थेत आहेत. या भातात औषधी गुणधर्म या भातात फायबर, लोह, ताम्र, अॅन्टीआॅक्सिडंटचे प्रमाण अधिक आहे. भारतात हा आसामी काळभात म्हणून प्रसिद्ध आहे. पंचतारांकित हॉटेलात याला मोठी मागणी असते. उंची जास्त व दणकट बुंधा असल्याने वाºयाने पडत नाही. एकरी वीस ते पंचवीस पोते साळ निघते.
शिजवल्यावर दिसतो जांभळा हा भात इंडोनेशिया व आसामच्या व्यापार संबंधातून भारतात आला. त्याची साळ निळी, जांभळी तर तांदूळ गर्द जांभळे व लांबट आहेत. औषधी गुणधर्म असलेला हा भात शिजवल्यावरही जांभळा दिसतो. सध्या बाजारात तीनशे ते पाचशे रुपये दराने विक्री होते. आसाम, मणिपूर, पंजाबमध्ये निर्यातक्षम तांदुळात याची गणना होते.