इंदोरीकर महाराजांंचे आवाहन : माझ्या समर्थनार्थ बंद, मोर्चे नकोत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 02:22 AM2020-02-18T02:22:25+5:302020-02-18T02:22:38+5:30
इंदोरीकर महाराजांंचे आवाहन : गाव म्हणाले, इंदोरीकरांच्या वाटेला जाऊ नका
अकोले (जि. अहमदनगर) : वारकरी संप्रदाय शांतता प्रिय आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर माझ्या समर्थनार्थ मोर्चे, रॅली काढू नका. जमावाने आंदोलन करु नका. गावागावात निषेध सभा घेऊ नका. सोशल मीडियावरुन फिरणाऱ्या पोस्टला प्रत्युत्तर देऊ नका, असे आवाहन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) यांनी सोमवारी एका पत्रकाद्वारे केले आहे.
इंदोरी (ता. अकोले) या मूळ गावी इंदोरीकर यांच्या समर्थनासाठी ग्रामस्थ एकत्र जमले होते. त्याचवेळी इंदोरीकर यांनी निरोप पाठवून ग्रामसभा न घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे ग्रामसभा रद्द झाली. मात्र इंदोरीकर यांच्याविषयी राळ उठवणाऱ्यांना अनुल्लेखाने प्रत्युत्तर देण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांनी मांडला. इंदोरीकर यांच्या वाटेला कुणी जाऊ नका. वेळ पडल्यास इंदोरीचे पाणी दाखवू, असा पवित्राही ग्रामस्थांनी घेतला. इंदोरीकर हे अनेक अनिष्ट प्रथांवर प्रहार करतात. ते जे बोलतात ते लोकांनाही पटते. उगाच साप म्हणून भुई झोडपू नये, अशा शब्दात ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पिंपरी-चिंचवडमध्ये मोशी येथे संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा सोमवारी झाला. सोहळ््यानिमित्त इंदोरीकर महाराजांची बैलगाडीतून मिरवणूक काढून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
लोटांगण घालून सांगतो, शूटिंग थांबवा
माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. माणसाचे नाव झाले, पैसा आला की, त्याला शत्रू निर्माण होतात. दोन दिवसांत या लोकांनी माणूसच संपवला, हे योग्य नाही. त्यामुळे लोटांगण घालून सांगतो, कॅमेरे बंद करा, आता शूटिंग थांबवा, असे भावनिक आवाहन इंदोरीकर यांनी पिंपरी-चिंचवड येथे केले.
समर्थन नाही, मात्र पाठीशी - चंद्रकांत पाटील
इंदोरीकर यांची अनेक कीर्तन-प्रवचने होतात. ती सर्व समाजप्रबोधनाची असतात. कीर्तनातून ते शिक्षणाचे, पाण्याचे महत्त्वही सांगतात. पण त्यांनी महिलांबद्दल असे म्हणायला नको होते, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मात्र एका वाक्याने माणसाचे सगळे काही गेले, असे म्हणता येणार नाही.
मी सुद्धा इंदोरीकर यांच्या कीर्तनाला जातो. पाच मिनिटांसाठी जातो आणि तासभर थांबतो. मार्मिक भाषेत ते समाजातील चुकांवर बोट ठेवत असतात. त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करीत नाही, मात्र त्यांच्या पाठिशी आहे, असे पाटील म्हणाले.
...आणि कॅमेरे बंद झाले
कीर्तनाच्या सुरुवातीलाच इंदोरीकरांनी कॅमेरे बंद करण्यास सांगून व्हिडिओ शूटिंग करू नका, असे आवाहन केले. त्यानंतर वाहिन्यांचे कॅमेरे बंद झाले.
गेली पंचवीस-सत्तावीस वर्षे मी कीर्तन करत आहे. कधी अडचण आली नाही, आक्षेप आले नाहीत. आत्ताच अडचणी निर्माण झाल्या कशा? मी जे तेव्हा बोललो तेच मी आता बोलत आहे, हे आपण सर्व जाणताच, असे ते म्हणाले.
‘...म्हणजे गुन्हा दाखल होईलच असे नाही’
संपूर्ण दोन तासांतील नेमके तेच शब्द पकडून त्याचा बाऊ करण्याची पद्धत चुकीची आहे. इंदोरीकर महाराजांना नोटीस दिली म्हणजे गुन्हा दाखल होईलच, असे नाही. परंतु, ते जे काही बोलले त्यावर कायदा आपले काम करेल, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उस्मानाबाद येथे सांगितले.