अनाथ, निराधार २५० विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शिक्षण : इंदोरीकर महाराजांचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 03:30 PM2019-06-23T15:30:28+5:302019-06-23T15:31:27+5:30
ओझर खुर्द (ता.संगमनेर) येथे ज्ञानेश्वर माऊली सेवाभावी संस्था सुरू केली. सुरूवातीला शंभर अनाथ, निराधार मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले.
योगेश रातडिया
आश्वी : ओझर खुर्द (ता.संगमनेर) येथे ज्ञानेश्वर माऊली सेवाभावी संस्था सुरू केली. सुरूवातीला शंभर अनाथ, निराधार मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले. आता या केंद्रात २५० मुले शिक्षण व अध्यात्माचे धडे घेत आहेत. समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) आपल्या कीर्तनाच्या मानधनातून व स्वर्चातून या मुलांना शिक्षणाचे धडे देत आहेत.
वर्षानुवर्षे चालत आलेल्या समाजातील प्रथा, कर्मकांड, दैनंदिन जीवनातील घडामोडींवर आपल्या विनोदी शैलीतून ताशेरे ओढत समाजप्रबोधन करणारे इंदोरीकर महाराज सर्वांना परिचत आहेत. पण सध्या काही तथाकथीत लोकांकडून इंदोरीकर महाराज हे अवाजावी मानधन घेत असल्याची चर्चाही केली जाते. दुसरीकडे स्वत: निवृत्ती महाराज हे जाहीर कीर्तनातून आपण लोकांना खसकविण्याचे पैसे घेत असल्याचे सांगत असतात. मात्र या मानधनातून मिळणाऱ्या पैशाचा विनयोग ते सेवा भावनेतून करताना दिसत आहेत. समाजातील अनाथ व निराधार मुलांसह शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांमुलींसाठी मोफत शाळा चालविण्यासाठी ते खर्च करीत आहेत. अध्यात्मिक व संस्कारक्षम शिक्षण देऊन सुसंस्कृत समाज निर्मिती करण्याचे कामही इंदोरीकर करीत आहेत.
शिक्षणाचे बाजारीकरण झालेल्या समाजात स्वखर्चातून ओझर खुर्द (ता. संगमनेर) येथे ज्ञानेश्वर माऊली सेवाभावी संस्था स्थापन केली. अनाथ निराधार मुलांना महाराजांनी दत्तक घेतले आहे. या शाळेत मुलांची राहण्याची उत्तम व्यवस्था, मनोरंजनासाठी टिव्ही, सकाळी चहा, नाष्टा तसेच दोन वेळा जेवण दिले जाते. या सर्व विद्यार्थ्यांचा वह्या, पुस्तकांसह कपड्यांचा खर्च इंदोरीकर महाराज स्वत: करतात.
ज्ञानेश्वर माऊली सेवाभावी संस्था
ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत विनाअनुदानित खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय ओझर बुद्रूक (ता. संगमनेर) येथे सुरू केले आहे. या विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीच्या २५० मुलामुलींना कुठलीही प्रवेश फी, परीक्षा फी ते घेत नाहीत. शिवाय या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके मोफत दिली जातात.
विना अनुदानित असलेल्या या शाळेच्या शिक्षकांच्या पगारापासून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा सर्व खर्च निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) स्वत: करतात. शिवाय स्वत: ते बी.एस्सी., बी.एड.असल्याने विद्यार्थ्यांना ते वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात. -आण्णासाहेब केसकर, प्राचार्य