'ठोस पुराव्याशिवाय इंदोरीकरांवर कारवाई नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 03:02 AM2020-02-21T03:02:19+5:302020-02-21T03:02:53+5:30
जिल्हा शल्य चिकित्सकांचे स्पष्टीकरण; खुलाशात महाराजांनी फेटाळले आरोप
अहमदनगर : जिल्हा रूग्णालयाच्या पीसीपीएनडीटी समितीने इंदोरीकर यांच्याकडून मागवलेल्या खुलाशात त्यांनी आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे ज्या वृत्तपत्रात वादग्रस्त वक्तव्याबाबतची बातमी प्रथम प्रसिद्ध झाली. त्यांनाही नोटीस पाठवून पुरावे मागितले आहेत. म्हणजे जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत इंदोरीकर यांच्यावर कारवाई करता येणार नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक तथा पीसीपीएनडीटी समितीचे अध्यक्ष डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी गुरूवारी माध्यमांना सांगितले.
कीर्तनकार इंदोरीकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी गर्भलिंग निदानाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने पीसीपीएनडीटी समितीने सात दिवसांपूर्वी त्यांच्याकडे खुलासा मागवला होता. इंदोरीकर यांनी वकिलांकरवी बुधवारी खुलासा जिल्हा रूग्णालयाकडे सादर केला. ‘मी असे कीर्तन केलेच नाही. जानेवारी आणि फेब्रुवारीत नगर जिल्ह्यात कोठेच कीर्तन झालेले नाही. उलट समाजप्रबोधन करत असल्याने महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी पुरस्कार देऊन सन्मान केला. आम्ही कोणत्याही कीर्तनाचा व्हीडिओ यू ट्यूबला दिलेला नाही. एवढेच काय कोणत्याही कीर्तनाची रेकॉर्डिंगही करत नाही’ असे इंदोरीकर यांनी खुलाशात म्हटल्याचे डॉ. मुरंबीकर म्हणाले. ज्या वर्तमानपत्रात प्रथम बातमी प्रसिद्ध झाली. त्यांनाही आपण नोटीस देऊन पुरावे मागितले आहेत. ते मिळाल्यानंतर छाननी करून पुढील दिशा ठरवता येईल, असे डॉ. मुरंबीकर यांनी सांगितले.
‘लोकमत’चा अंदाज तंतोतंत खरा
इंदोरीकर यांनी बुधवारी जो खुलासा केला त्याबाबत जिल्हा रूग्णालयाने अत्यंत गुप्तता पाळली होती. रूग्णालय किंवा इंदोरीकरांचे वकील, सेवेकरी यांनी या खुलाशात नेमके काय म्हटले आहे, याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला होता. परंतु ‘लोकमत’ला इंदोरीकरांच्या निकटवर्तीयांकडून खुलाशातील माहिती मिळाली होती. ती ‘लोकमत’ने बुधवारी प्रसिद्ध केली. गुरूवारी जेव्हा खुलासा समोर आला तेव्हा त्यातील मजकूर तंतोतंत बरोबर असल्याचे स्पष्ट झाले.