इंदोरीकर यांच्यामुळे अनेक वाईट प्रथा बंद: बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 12:39 PM2020-02-18T12:39:47+5:302020-02-18T12:39:58+5:30
पंचवीस वर्षे त्यांनी समाज प्रबोधनाचे केलेले कार्य कौतुकास्पद आहे.
अहमदनगर : कीर्तनच्या माध्यमातून अनेक विषयांवर परखड मत व्यक्त करणारे निवृत्ती महाराज इंदुरीकर मुला-मुलींच्या जन्माबाबत केलेल्या विधानावरून वादात साडपले आहेत. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत असून, इंदोरीकरांनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन करता येणार नाही, मात्र गेल्या 25 वर्षांपासून त्यांचे सुरु असलेले काम सुद्धा कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
थोरात म्हणाले की, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकरांनी केलेले वक्तव्य असमर्थनीय आहे. मात्र पंचवीस वर्षे त्यांनी समाज प्रबोधनाचे केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्यामुळे समाजातील अनेक वाईट प्रथा बंद झाल्या आहेत, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
तर गर्भलिंग निदान बाबत इंदोरीकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या व्हिडिओमुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले. इंदोरीकर यांच्या कीर्तनामुळे समाजामधील अनेक चुकीच्या चाली-रिती बंद झाल्या आहेत. ते चालवित असलेली शाळा, कीर्तनाच्या माध्यमातून करीत असलेले समाज प्रबोधनाचे काम योग्यच आहे.