इंदोरीकर महाराज प्रकरणावर १६ सप्टेंबरला होणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 03:55 AM2020-08-21T03:55:31+5:302020-08-21T03:55:47+5:30
या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हस्तक्षेप अर्ज केल्याने ही सुनावणी लांबणीवर पडली.
संगमनेर (जि. अहमदनगर) : निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणाची पुढील सुनावणी आता १६ सप्टेंबरला होणार आहे. या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हस्तक्षेप अर्ज केल्याने ही सुनावणी लांबणीवर पडली. इंदोरीकर यांच्याविरुद्ध बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरून संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये फिर्याद दाखल झाली होती.
तत्पूर्वी समाजप्रबोधनकार निवृती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथील निवासस्थानी शनिवारी (१५ ऑगस्ट) खासदार डॉ. सुजय विखे यांनी जात त्यांची भेट घेतली होती. यावेळी इंदुरीकर महाराजांनी खासदार विखे यांचा फेटा घालून सत्कार केला. तर विखेंनी त्यांना जय श्रीराम लिहिलेली भगवी शाल घातली. त्यामुळे देशमुखांचा फेटा अन् विखेची जय श्रीरामची शाल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. इंदुरीकर महाराजांच्या विरोधात सुरू झालेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांच्या ओझर बुद्रुक येथील निवासस्थानी काही राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या. माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनीही त्यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली होती. इंदुरीकर महाराजांच्या बाबतीत राज्य सरकारने सहानुभूती दाखवायला हवी होती. असे सांगत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही माजी मंत्री विखे यांनी दिली होती.