एसटी संपाचा पारनेरमधील उद्योगास दोन कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 05:02 PM2017-10-19T17:02:37+5:302017-10-19T17:06:07+5:30
फटाका विक्री व्यवसायात सुमारे पन्नास ते साठ युवक यंदा उतरले होते. सर्वाधिक फटका त्यांना संपाचा बसला आहे. संपामुळे बाहेरील शेजारील गावांमधील सामान्य लोक पारनेर शहरात आलेच नाही. त्यामुळे फटाका विक्री करणा-या दुकानांमध्ये शुकशुकाटच दिसत होता.
पारनेर : राज्यभरात सुरू असलेल्या एस़टीक़ामगारांच्या संपाचा परिणाम पारनेर शहरातील उद्योगांवरही झाला असून सुमारे दोन कोटींच्या अर्थकारणाचा फटका व्यावसायिकांना बसला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून एस़टी़चा संप सुरू आहे. पारनेर आगारातील कर्मचारीही यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले असल्याने एकही एस. टी. आगाराच्या बाहेर आली नाही. एस. टी. बंद असल्याने त्याचा फटका पारनेर शहरातील सर्वच छोट्या - मोठ्या व्यावसायिकांवर झालेला गुरूवारी बाजारात फेरफटका मारल्यानंतर दिसून आला. फटाका विक्री व्यवसायात सुमारे पन्नास ते साठ युवक यंदा उतरले होते. सर्वाधिक फटका त्यांना संपाचा बसला आहे. संपामुळे बाहेरील शेजारील गावांमधील सामान्य लोक पारनेर शहरात आलेच नाही. त्यामुळे फटाका विक्री करणा-या दुकानांमध्ये शुकशुकाटच दिसत होता. सुमारे वीस ते पंचवीस लाख रूपयांचा फटका या व्यावसायिकांना बसला आहे. पारनेर बसस्थानकाशेजारील विविध प्रकारची दुकाने नेहमी दिवाळीच्या काळात गजबजलेली असतात. यंदा तिकडेही शांतताच होती. पारनेर शहराची नवी पेठ, मुख्य शिवाजी पेठ परिसरांतही शुकशुकाट होता. अनेक छोटे-मोठे व्यावसायिक धरून सुमारे दीड ते दोन कोटींच्या अर्थकारणाचा फटका बसला.
बसस्थानकाकडे प्रवासी फिरकलेच नाहीत
एस. टी. संपाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार भारती सागरे, गटशिक्षणाधिकारी जयश्री कार्ले, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, आगारप्रमुख पराग भोपळे, विभागीय अधिकारी अनिता कोकाटे, सतिष कांबळे, तहसील कार्यालयाचे सचिन शिंदे यांनी प्रवाशांसाठी दोन बसेसचे नियोजन गुरूवारी सकाळपासून केले होते. मात्र एस. टी. संपामुळे बसस्थानकाकडे प्रवासी फिरकलेच नसल्याचे चित्र दिसून आले. तर पारनेर-सुपा, पारनेर-कान्हुर, पारनेर-देवीभोयरे या मार्गावर खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार प्रवाशांना मिळत होता असे चित्र दिसून आले.
सरकारच्या विरोधात कामगारांचे मुंडन
आम्ही दहा महिन्यांपासून आमच्या मागण्या मांडत असूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ऐन दिवाळीत सामान्य प्रवाशांना सरकारमुळेच हाल सोसावे लागत आहेत, असे कर्मचारी म्हणाले. सरकारने अद्यापही मागण्यांवर तोडगा काढला नाही म्हणून सरकारच्या विरोधात पारनेर एस. टी. आगारातील अनेक कर्मचा-यांनी सामूहिक मुंडन केले. यावेळी कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला होता.