१ हजार ३६१ ग्रामपंचायत सदस्य होणार अपात्र : जात प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:22 PM2018-08-26T12:22:15+5:302018-08-26T12:22:45+5:30
जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचे पद रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका नगर जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३६१ ग्रामपंचायत सदस्यांना बसला आहे. ग्रामीण भागात यामुळे मोठी खळबळ उडाली असून रिक्त होणाºया जागांवर पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे.
अहमदनगर : जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचे पद रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका नगर जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३६१ ग्रामपंचायत सदस्यांना बसला आहे. ग्रामीण भागात यामुळे मोठी खळबळ उडाली असून रिक्त होणाºया जागांवर पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आॅगस्ट २०१५ मध्ये साडेसातशे ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यात जिल्ह्यातील २ हजार १९१ सदस्यांनी आरक्षित जागेवर निवडणूक लढवली. या सदस्यांना पुढील सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक होते. त्यातील ८३० जणांनी वेळेत प्रमाणपत्र सादर केले. उर्वरित १३६१ पैकी ५३३जणांकडे जात वैधता प्रमाणपत्रच नव्हते. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व अप्पर जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने रद्द झाले. बाकी ८२९ जणांकडे प्रमाणपत्र होते. परंतु त्यांनी ते सादर करण्यास उशीर केल्याने त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी सुनावणी प्रक्रिया सुरू झाली.
सदस्यत्व रद्द झालेल्या उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानेही या उमेदवारांचे अपील फेटाळल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने अप्पर जिल्हाधिका-यांच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे हे ५३३ सदस्य व ज्यांचा निर्णय प्रलंबित होता असे ८३९ अशा एकूण १३६१ जणांना मोठा दिलासा मिळाला व सदस्य म्हणून ग्रामपंचायतीत कार्यरत झाले होते. त्यावर आता पाणी फेरले आहे. दरम्यान, जात प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याच्या कारणावरून गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर महापालिकेच्या २० नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य अपात्र ठरले असून, त्यात नगर जिल्ह्यातील १हजार ३६१ ग्रा. पं. सदस्यांचा समावेश आहे.
रिक्त जागांवर पोटनिवडणूक
या निर्णयामुळे रिक्त होणाºया पदांचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला जाईल. त्यानंतर रिक्त जागांवर पोटनिवडणूक घेण्याचा कार्यक्रम आयोगाकडून दिला जाईल. याशिवाय २०१५ नंतर झालेल्या निवडणुकांतील ज्या सदस्यांनी वेळेत जात प्रमाणपत्र सादर केले नाही, अशा सदस्यांचीही माहिती मागवली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासन सूत्रांनी दिली.
तालुकानिहाय अपात्र संख्या
संगमनेर.......... १९९
नेवासा........... १६२
नगर.............. १४९
पारनेर........... १२५
शेवगाव........ १०५
पाथर्डी........... १२३
कर्जत........... ९९
श्रीगोंदा......... ९८
अकोले......... ७६
जामखेड........ ६३
राहाता.......... ४८
राहुरी........... ४५
कोपरगाव...... ४०
श्रीरामपूर........ २९