मायगाव देवीत जनावरांमध्ये लंपी आजाराची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:22 AM2021-09-27T04:22:20+5:302021-09-27T04:22:20+5:30
लम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. कॅप्रिपॉक्स या प्रवर्गातील विषाणूंमुळे हा आजार होतो. ...
लम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. कॅप्रिपॉक्स या प्रवर्गातील विषाणूंमुळे हा आजार होतो. हा विषाणू शेळ्या - मेंढ्यांमध्ये होणाऱ्या देवीच्या विषाणूंशी साधर्म्य असणारा असून सर्वसाधारणपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. हा रोग सर्व वयोगटातील गोवंशीय जनावरांना होतो. लहान वासरे या रोगास अधिक प्रमाणात बळी पडतात.
हा विषाणूजन्य आजार असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते. प्रजनन क्षमतेवरही विपरित परिणाम होतो. सुरुवातीस दोन ते तीन दिवस जनावरांना बारीक ताप जाणवतो. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारणपणे पाठ, पोट, पाय व जननेंद्रिय आदी भागात येतात. बाधित जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठींमुळे चालताना त्रास होतो.