मास्क व्यवस्थापनासाठी १७ महाराष्ट्र बटालियनचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:24 AM2021-02-09T04:24:29+5:302021-02-09T04:24:29+5:30
अहमदनगर : वापरलेल्या मास्कची कशी विल्हेवाट लावावी, याच्या व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक १७ महाराष्ट्र बटालियनच्या एनसीसी छात्रसैनिकांनी दाखवले. मास्कमुळे मानवाची सुरक्षा, ...
अहमदनगर : वापरलेल्या मास्कची कशी विल्हेवाट लावावी, याच्या व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक १७ महाराष्ट्र बटालियनच्या एनसीसी छात्रसैनिकांनी दाखवले.
मास्कमुळे मानवाची सुरक्षा, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुरक्षित राहण्यासाठी मदत झाली. परंतु वापरलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट करणे गरजेचे आहे, अन्यथा त्याचा परिणाम पक्ष्यांवर होत असून भविष्यकाळात त्यावर धोका उदभवू शकतो, असे मत कर्नल जीवन झेंडे यांनी व्यक्त केले.
सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर युनिटशी सलग्न असणाऱ्या सर्व शाळा व महाविद्यालयांना कर्नल जीवन झेंडे यांनी तशा सूचना केल्या असून त्यात एनसीसी छात्रसैनिकांनी पुढाकार घेऊन मास्क वापरल्यानंतर त्यांची दोरी, अथवा लेस कापून काढावी. संबंधित मास्क पक्ष्यांच्या पायात अथवा गळ्यात अडकणार नाही, त्यातून आपण पक्ष्यांचा बचाव करू शकतो, असे छात्रांना सांगण्यात आले.
यासंदर्भात मेजर संजय चौधरी यांनी छात्रसैनिकांना एकत्र करून त्यासंदर्भात प्रात्यक्षिक करून दाखवले. या उपक्रमात एनसीसी छात्रसैनिकांनी पुढाकार घेतला आहे. छात्रसैनिकांनी या उपक्रमात भाग घेऊन प्रसार करणाऱ्या छात्र सैनिकांना विविध प्रोत्साहनपर बक्षीस ठेवले असून त्यासंदर्भात सोशल मीडियावर १७ महाराष्ट्र बटालियनच्या छात्रसैनिकांमार्फत जनजागृती राबवली जाणार असल्याचे मेजर संजय चौधरी यांनी सांगितले. मास्कची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यामुळे पक्ष्यांना स्थलांतर करण्यास अडथळा निर्माण होऊ लागला आहे. म्हणून पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये याकरता छात्र सैनिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन चौधरी यांनी केले.
-------
फोटो - ०८एनसीसी
सतरा महाराष्ट्र बटालियनच्या एनसीसी छात्रसैनिकांना वापरलेल्या मास्कची कशी विल्हेवाट लावायची याचे प्रात्यक्षिक मेजर संजय चौधरी यांनी दाखवले.