कोरोनाबाबतच्या तपासण्यांसाठी मायंबा देवस्थानचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:21 AM2021-05-10T04:21:27+5:302021-05-10T04:21:27+5:30
तिसगाव : मायंबा देवस्थानने कोविड सेंटरनंतर आता कोरोनाच्या महागड्या तपासण्यांसाठीही पुढाकार घेतला आहे. यासाठी चाळीस हजार चाचणी किटचे नियोजन ...
तिसगाव : मायंबा देवस्थानने कोविड सेंटरनंतर आता कोरोनाच्या महागड्या तपासण्यांसाठीही पुढाकार घेतला आहे. यासाठी चाळीस हजार चाचणी किटचे नियोजन केले आहे, अशी माहिती आमदार तथा विश्वस्त सुरेश धस यांनी दिली.
रविवारी दुपारी मायंबा देवस्थानवर रॅपिड अँटिजन तपासणी सेवेचा प्रारंभ तहसीलदार राजाभाऊ कदम, नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे यांच्या हस्ते करण्यात आला. धस म्हणाले, देवस्थानने सेवाभावाच्या तत्त्वावर मनुष्यबळाचा खर्च सहन करीत महागड्या तपासण्यांसाठीचा पुढाकार घेतला आहे. रॅपिडचे दहा हजार किट उपलब्ध झाले आहेत. सध्या खासगी स्तरांवरील तपासणी केंद्रात नऊशे ते हजार रुपये आर्थिक शुल्क घेऊन कोरोना तपासण्या केल्या जातात. देवस्थान चाचणी केंद्रात केवळ किटचे ११५ रुपये शुल्क घेतले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात रुग्ण संख्या विचारात घेऊन खेडोपाडी वाडीवस्तीवर जाऊन ही तपासणी मोहीम राबविली जाणार आहे.
प्रास्ताविक देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे यांनी केले. सचिव बाबासाहेब म्हस्के यांनी आभार मानले. सरपंच राजेंद्र म्हस्के, विजयानंद स्वामी, डॉ. अजित लोणकर, अशोक पवार, दीपक वामन, विश्वस्त नवनाथ म्हस्के उपस्थित होते. येथील कोविड सेंटरमध्ये चाळीस रुग्ण उपचार घेत आहेत. दोन वेळ सकस आहार, चहा, नाष्टा, गुळवेल काढा तर रात्री हळदयुक्त दूध रुग्णांना दिले जाते, असे सचिव बाबासाहेब म्हस्के यांनी सांगितले.