साईनाथ रूग्णालयाच्या पुढाकाराने शिर्डीत पावणेचार लाख रूग्णांना मिळाली मोफत दवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 07:25 PM2018-01-10T19:25:48+5:302018-01-10T19:26:24+5:30
सार्इंचा रुग्णसेवेचा वसा चालविणा-या साईनाथ रूग्णालयात गेल्या वर्षभरात जवळपास ३ लाख ६६ हजार रूग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. यात ३ लाख ५१ हजार बाह्यरूग्ण तर १५ हजार ६७२ अंतर्रूग्णांचा समावेश आहे.
शिर्डी : सार्इंचा रुग्णसेवेचा वसा चालविणा-या साईनाथ रूग्णालयात गेल्या वर्षभरात जवळपास ३ लाख ६६ हजार रूग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. यात ३ लाख ५१ हजार बाह्यरूग्ण तर १५ हजार ६७२ अंतर्रूग्णांचा समावेश आहे. यातील साडेदहा हजार रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी दिली.
साईसमाधी वर्षाच्या पार्श्वभूमिवर डॉ़ हावरे यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापनाने १ जानेवारी २०१७ पासून साईनाथ रूग्णालय पूर्णपणे मोफत केले. यामुळे २०१६ च्या तुलनेत गेल्या वर्षी बाह्यरूग्ण विभागात ६४ हजार ५६७ (२२़५ टक्के) तर अंतर्रूग्ण विभागात ४ हजार २४ (३४़५ टक्के) रूग्णांची वाढ झाली. तीनशे खाटांच्या या रूग्णालयात अॅलोपॅथी, होमिओपॅथी व आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यात येतात़ शस्त्रक्रिया विभागात पोट, जीभ व गालाचे कॅन्सर, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, थायरॉईड आजार तसेच आॅर्थोपेडिक विभागात सांधेरोपण शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभागात लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केल्या जातात, असे वैद्यकीय अधीक्षिका डॉ़ मैथिली पितांबरे यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरात रूग्णालयातील अनुदान विभागामार्फत ८३६ रूग्णांना दोन कोटींची वैद्यकीय मदत देण्यात आली. साईनाथ रूग्णालयाच्या रक्तपेढीने आजवर १ लाख ७० हजार रक्त पिशव्या संकलन करून रूग्णांना पुरवठा केला आहे़ शिर्डी परिसरातील सोळा गावांमध्ये आठवड्यातील चार दिवस फिरत्या वैद्यकीय पथकामार्फत गरीब व गरजू रूग्णांवर मोफत उपचार करण्यात येतात.
मागील जानेवारीत झालेल्या किडनी स्टोन शिबिरात ४९ रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया झाल्या, शताब्दीच्या पहिल्याच दिवशी आयोजित करण्यात आलेल्या नेत्ररोग शिबिरात १०७ रूग्णांवर मोतीबिंदू तर दोन रूग्णांवर तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याशिवाय १०२५ रूग्णांना मोफत चष्मे देण्यात आले.
एक कोटी रूपयांची वैद्यकीय उपकरणे दान
संस्थानकडून या रूग्णालयाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सेवाभावी कामात अनेक दानशूर भाविकही हातभार लावत असतात. गेल्या वर्षात जवळपास एक कोटी रूपयांची पन्नास वैद्यकीय उपकरणे, फर्निचर, औषधे व आवश्यक साहित्य देणगी स्वरूपात आले. यात सोनोग्राफी मशिन, डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी फेको मशिन, गायनिक सर्जरी करीत ओटी टेबल, आॅटोक्लेव, आॅर्थो ड्रिलिंग, इसीजी, पोर्टेबल एक्स-रे मशिन तसेच लॅबोरॅटरी,गायनिक व ईएनटी विभागातील वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. गोरगरीबांसाठी वरदान असलेल्या या रूग्णालयात गर्दीबरोबर वाढलेल्या समस्यांचेही निराकरण आवश्यक आहे.