म्युकरमायसोसिसवरील इंजेक्शनेच मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:19 AM2021-05-16T04:19:42+5:302021-05-16T04:19:42+5:30

अहमदनगर : म्युकरमायसोसिस या आजारावरील इंजेक्शन नगर जिल्ह्यात उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील रुग्णांना सध्या बाहेरच्या जिल्ह्यातून इंजेक्शन आणण्यासाठी ...

Injections on mucorrhoea are not available | म्युकरमायसोसिसवरील इंजेक्शनेच मिळेनात

म्युकरमायसोसिसवरील इंजेक्शनेच मिळेनात

अहमदनगर : म्युकरमायसोसिस या आजारावरील इंजेक्शन नगर जिल्ह्यात उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील रुग्णांना सध्या बाहेरच्या जिल्ह्यातून इंजेक्शन आणण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. सध्याच्या स्थितीला जिल्ह्यात किमान एका दिवसाला शंभर इंजेक्शनची मागणी असते. मात्र त्यात एकही इंजेक्शन सध्य स्थितीला उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांनी इतर जिल्ह्यात उपचारासाठी धाव घेतली आहे.

कोरोना होऊन गेलेल्या रुग्णाला म्युकरमायसोसिस या आजाराची लागण होत असल्याचे दिसून आले आहे. नगर शहरात सध्या १८ रुग्ण आढळून आले असून श्रीरामपूर, श्रीगोंदा तालुक्यातही चार ते पाच रुग्ण आहेत. डोळे, दात, नाक, घसा, डोळे यामध्ये काळी बुरशी सुरू होते. त्यासाठी रुग्णांना छोट्या शस्त्रक्रियाही कराव्या लागत आहेत. त्याचा खर्च, शिवाय रुग्णाला रोज चार इंजेक्शन द्यावी लागतात. एक इंजेक्शन आठ ते दहा हजार रुपयांना आहे. तज्ज्ञांच्या मते रुग्णाला एकूण ४०, ६० किंवा ८० इंजेक्शन द्यावी लागतात. त्यामुळे त्याचा खर्चही मोठाच आहे.

----------

मागणी किती, पुरवठा किती ?

सध्या नगर शहरात १८ ते २० व इतर दोन तालुक्यात चार ते पाच रुग्ण आढळून आले आहेत. एका रुग्णाला रोज चार इंजेक्शनची मागणी आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यात सध्यातरी १०० पेक्षा जास्त इंजेक्शनची मागणी आहे. मात्र हे इंजेक्शन सध्यातरी मिळत नसल्याची स्थिती आहे. यासाठी इतर जिल्ह्यातूनही मागणी होत आहे. गेल्या दोन दिवसात म्युकरमायसोसिसवरील एकही इंजेक्शन प्राप्त झाले नाही.

-------------

इंजेक्शन, औषधी मिळेनात

नगर शहरात १८ रुग्ण आहेत. त्यातील काही रुग्ण हे पुणे व नाशिक येथे उपचारासाठी रवाना झाले आहेत. जे रुग्ण इथे आहेत, त्यांनाही इंजेक्शन मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. तसेच डॉक्टरांकडून दिली जाणारी इतर औषधेही मिळत नसल्याची स्थिती आहे.

----------------

जिल्ह्यातील म्युकरमायकाेसिसचे संशयित रुग्ण- २५

इंजेक्शनची दररोजची मागणी-१००

यापूर्वीची दररोजची मागणी-०

------------

-------------

ओठ, नाक, जबड्याला फटका

गालावर दुखणे, चेहऱ्यावर मुंग्या येणे, नाक कोरणे पडणे, नाकातून काळा स्राव येणे, दात दुखणे, दात हलायला लागणे, नाकावर व टाळूवर काळे डाग उमटणे, डोळा दुखणे, डोकेदुखी अशी आजाराची लक्षणे आहेत. या आजारामुळे ओठ, नाक, जबड्याला फटका बसतो. प्रसंगी शस्त्रक्रियाही करावी लागते.

-------------

तज्ज्ञ काय म्हणतात...

कोरोनावर मात केल्यानंतर त्याचा आनंद साजरा केला जातो, मात्र काही दिवस गाफील न राहता सतर्क राहणे गरजेचे आहे. लक्षणे दिसू लागताच तज्ज्ञ डॉक्टरांकड़े जाऊन सल्ला घ्या, उपचार घेणे आवश्यक आहे. साखर ही नियंत्रणात ठेवावी. या आजारावरही मात करणे शक्य आहे.

-डॉ. धनंजय कुलकर्णी, कान-नाक-घसा तज्ज्ञ

-------------

म्युकर हे इन्फेक्शन हे के‌वळ नाकापुरते मर्यादित नाही. बुरशी ही डोळ्यात आली तर तो भाग काढून घेतला जातो. तसेच बुरशीचा प्रसार होण्यापूर्वी ती नियंत्रणात आणली जाते. हा आजार अंगावर काढूच नये. आपण सतर्क राहिले नाही तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो.

-डॉ. रोहित थोरात, नेत्रतज्र्ज्ञ

-----------

म्युकरमायसोसिस आजाराची रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. या आजारावरील काही इंजेक्शन्स बाजारात सध्या मिळत नाहीत. त्यामुळे डॉक्टरांचीही अडचण वाढत आहे. कोरोना झाल्यानंतरच्या काळात रुग्णांनी काळजी घेणे व शरीरामधील हालचालीबाबत सतर्क राहून वेळीच उपचार घेणेच जास्त गरजेचे आहे.

-डॉ. संजय आसनानी, जबड्यांच्या विकाराचे तज्र्ज्ञ

---------

एका रुग्णाला लागतात ४० डोस

एका रुग्णाला किमान ४० डोस लागतात. दररोज चार इंजेक्शन द्यावी लागतात. काही रुग्णांना २० इंजेक्शन, तर काही रुग्णांना ८० इंजेक्शनही द्यावी लागत आहेत. त्यामुळे या इंजेक्शनचा खर्चही मोठ्या प्रमाणावर आहे.

---

नेट फोटो डमी

ईएनटी

इंजेक्शन

म्युकर

स्टार ७१५-१३, म्युकरमायसोसिस इंजेक्शन

आय

टीथ

Web Title: Injections on mucorrhoea are not available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.