मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकली शाई; तरुणीचे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 01:39 AM2019-09-14T01:39:47+5:302019-09-14T01:40:02+5:30

पिचडांना उमेदवारी न देण्याची मागणी

Ink thrown at the CM's coffin; The act of a young woman | मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकली शाई; तरुणीचे कृत्य

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकली शाई; तरुणीचे कृत्य

अकोले (अहमदनगर) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा अकोले येथे आली असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विद्यार्थी आघाडीची प्रदेशाध्यक्षा शर्मिला येवले हिने त्यांच्या ताफ्यावर शाई फेकल्याचा प्रकार घडला. त्यांनी पिचडांविरोधात घोषणाही दिल्या.

नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहुरी या तालुक्यांसह नगर शहरात शुक्रवारी महाजनादेश यात्रा आली होती. अकोल्यात सुगाव येथे यात्रा आली असता येवले ही रस्त्याने फडणवीस यांच्या ताफ्याच्या दिशेने पळत गेली व शाई फेकली. पिचड यांना उमेदवारी देऊ नका. अकोल्यात तुम्ही आले आहात तर येथे विकास दाखवा, अशा घोषणा तिने दिल्या. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलेले नाही. गोपनीय पद्धतीने तिने अचानक आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे हे माजीमंत्री मधुकर पिचड यांची चौकशी करावी, या मागणीसाठी तहसील कचेरीसमोर लाक्षणिक उपोषणास बसले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले
आहे.

निवृत्ती महाराज इंदोरीकर मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर
नगर जिल्ह्यात संगमनेर येथे झालेल्या सभेत ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांनी व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांची सपत्नीक भेट घेतली. एक लाख रुपयांचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री निधीसाठी दिला. मात्र, त्यांनी काहीही भाष्य केले नाही. मालपाणी परिवाराचे संजय मालपाणी हे देखील या सभेला उपस्थित होते.

विरोधी पक्षनेतेपद तरी टिकवा : मुख्यमंत्री
विरोधकांनी विरोधी पक्षनेतेपद टिकविण्याइतके तरी राजकारण करावे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी अकोले येथे केली. आमची लढाई वंचित आघाडीशी आहे, असे ते यापूर्वी म्हणाले होते. शुक्रवारी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेतेपद टिकविण्याचा सल्ला दिला. कोकणात वाहून जाणारे पाणी नगर, मराठवाड्यासाठी वळवू असे ते राहुरी येथील सभेत म्हणाले.

Web Title: Ink thrown at the CM's coffin; The act of a young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.