पाथर्डी बाजार समिती, नगरपालिका कामकाजाची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:26 AM2021-08-20T04:26:00+5:302021-08-20T04:26:00+5:30
पाथर्डी : तालुक्यातील भगवानगड व परिसराच्या पाणी योजनेवरून पितळ उघडे पडल्यामुळे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी आमदार मोनिका राजळे आमच्यावर ...
पाथर्डी : तालुक्यातील भगवानगड व परिसराच्या पाणी योजनेवरून पितळ उघडे पडल्यामुळे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी आमदार मोनिका राजळे आमच्यावर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. बाजार समितीच्या मागील १६ वर्षांतील व नगरपालिकेच्या पाच वर्षांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी आम्ही उपमुखमंत्री व नगरविकासमंत्री यांनी भेटून करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, नगरसेवक बंडूपाटील बोरुडे, इतर पदाधिकाऱ्यांनी दिली.
भगवानगड व परिसराच्या पाणी योजनेवरून आमदारांनी त्या भागातील लोकांची फसवणूक केली. निवडणूक होती म्हणून या योजनेचे गाजर जनतेपुढे आणले. परंतु, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर फसवणूक लक्षात आली. २०१४-२०१९ पर्यंत तुमचे सरकार राज्यात व दिल्लीत होते. या काळात तुम्हाला भगवानगड पाणी योजनेचा विषय मार्गी लावण्यात कोणी अडविले होते. खोटे बोलून भावनिक वातावरण करून मते मिळवायचे ही तुमची जुनीच सवय आहे. आता पितळ उघडे पडायला लागल्यावर आमच्यावर टीका करून जनतेचे लक्ष दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाजार समितीचे भूखंड विकल्याचा आमच्यावर आरोप तुमच्या पदाधिकाऱ्याने केला. मात्र आमच्या काळात पाथर्डीतील ७४ पैकी केवळ ६ भूखंड आम्ही नियमाप्रमाणे वितरित केले. मग उर्वरित ६८ भूखंडाचे श्रीखंड कोणी कोणाच्या काळात खाल्ले. कदाचित टक्केवारीची सवय या पदाधिकाऱ्याला जडल्याने त्यातील मलिदा मिळाला नसल्याने त्याने नथीतून तीर मारला असावा, अशी टीका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. प्रसिद्धी पत्रकावर चांद मणियार, सीताराम बोरुडे, सविता भापकर, संगीता डोमकावळे, बन्सी आठरे, मंगल गर्जे, वैभव दहिफळे, योगेश रासने, देवा पवार, अक्रम आतार, दिगंबर गाडे, माधुरी आंधळे, बाळासाहेब घुले आदींच्या सह्या आहेत.
---
स्वच्छतेसाठी औरंगाबादचा ठेकेदार का?
पालिकेचा कारभार कसा आहे हे शहरातील सामान्य जनतेला माहीत आहे. या संस्थेची परिस्थिती अलीबाबा चाळीस चोर अशी झाली आहे. शहर स्वच्छतेचा ठेका औरंगाबाद येथील ठेकेदाराला देण्यामागे नेमके गौडबंगाल काय आहे? शहरात दीड कोटींचे एलईडी बल्ब बसविले असे सांगतात. मात्र एखादा तरी चालू आहे का ते दाखवा? पालिकेत मिल बाट के खावो अशी परिस्थिती आहे, अशी टीका त्यांनी केली.