नगर जिल्हा बँकेच्या नोकरभरतीची चौकशी सुरू; ६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 07:12 PM2017-11-02T19:12:27+5:302017-11-02T19:24:06+5:30
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वादग्रस्त ठरलेल्या नोकरभरतीबाबत बुधवारपासून चौकशी सुरू झाली आहे. या नोकरभरतीबाबत ‘लोकमत’ने सुरुवातीपासून ...
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वादग्रस्त ठरलेल्या नोकरभरतीबाबत बुधवारपासून चौकशी सुरू झाली आहे.
या नोकरभरतीबाबत ‘लोकमत’ने सुरुवातीपासून सातत्याने आवाज उठवित पाठपुरावा केला होता. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांचा मुलगा परीक्षार्थी असतानाच वर्पे निवड समितीचे सदस्य म्हणून काम पाहत होते. याबाबतच्या वृत्ताची सहकार खात्याचे मंत्री सुभाष देशमुख, सहकार आयुक्त विकासकुमार झाडे यांनी तत्काळ गंभीर दखल घेतली. त्यानंतर त्यांनी याबाबत नाशिक येथील विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांना चौकशीचे आदेश दिले होते. भालेराव यांनी तत्काळ बँकेस पत्र देऊन नोकरभरतीची नियुक्ती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत तातडीने थांबविण्याचे आदेश दिले. तसेच अहमदनगरच्या उपनिबंधकांना याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. त्यानुसार नगर तालुक्याचे सहायक निबंधक राम कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारपासून नोकरभरतीबाबत चौकशी करण्यास सुरूवात केली. या पथकाने जिल्हा बँकेत जाऊन बँकेच्या अधिका-यांकडून नोकरभरती प्रक्रियेची माहिती घेतली. मागितलेली माहिती व आवश्यक कागदपत्रे बँकेच्या अधिका-यांनी या पथकाच्या अधिका-यांना उपलब्ध करून दिली.
या भरती प्रक्रियेबाबत कोणाच्या काही तक्रारी, हरकती किंवा आक्षेप असल्यास त्यांनी ६ नोव्हेंबरच्या दुपारी ३ वाजेपर्यंत लेखी स्वरुपात कागदपत्रांच्या पुराव्यांसह आपल्या तक्रारी, आक्षेप जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा बँक, तिसरा मजला, अहमदनगर येथे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सादर करण्याचे आवाहन चौकशी अधिकारी तथा सहायक निबंधक आर. बी. कुलकर्णी यांनी केले आहे.