राजकीय व्देषातून ‘मुळा-प्रवरा’वर घाला
By Admin | Published: September 7, 2014 11:40 PM2014-09-07T23:40:55+5:302014-09-07T23:47:11+5:30
लोणी : राजकीय द्वेषापोटी मुळा-प्रवरासारखी एक चांगली संस्था बंद पाडण्याचे कटकारस्थान केले गेले.
लोणी : राजकीय द्वेषापोटी मुळा-प्रवरासारखी एक चांगली संस्था बंद पाडण्याचे कटकारस्थान केले गेले. कामगारांचे आणि सभासदांचे निर्माण झालेले प्रश्न शेवटपर्यंत सोडविण्याचा माझा प्रयत्न आहे. सर्व स्तरावर संघर्ष करून मुळा-प्रवरा कामगारांच्या पाठिशी उभे राहिलो म्हणूनच कामगारांच्या काही रक्कमा मिळवून देण्यात यश आले. येणाऱ्या काळातही कामगारांची पै नं पै मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मुळा-प्रवरा वीज कामगार संघटनेच्या वतीने विखे पाटील यांचा कृतज्ञता सोहळा प्रवरानगर येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी विखे यांनी कामगारांशी संवाद साधला. संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब म्हस्के, कामगार सभेचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर, वीज कामगार संघटनेचे अध्यक्ष गोरक्ष विखे आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, मुळा-प्रवरा संस्था आपले कुटुंब होते. या कुटुंबालाच धक्का लावण्याचा प्रयत्न झाला. दृष्ट लागावी असे काम या संस्थेतून सुरू होते. राजकीय द्वेषापोटी संस्था घालविण्याचा काहींना आनंद झाला. मात्र संस्था जाण्यापेक्षाही कामगारांना जो त्रास झाला याचे दु:ख अधिक आहे. केवळ काही आरोपांवरून संस्थेला आणि व्यक्तीश: आम्हाला बदनाम केले गेले. मात्र न्यायालयीन स्तरावर संस्थेच्या बाजूने लागलेल्या काही निकालांमुळे सर्व घटनाक्रम आता उघड होत चालला असल्याचे त्यांनी सांगितले.
वीज नियामक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार संस्थेला दर महिन्याला एक कोटी रुपये देणे बंधनकारक असतानादेखील आज ४१ महिने होऊनही कुठलेही पैसे संस्थेला मिळाले नाहीत. आयकर संदर्भात लढलेली न्यायालयीन लढाई ही देशात एकमेव उदाहरण ठरले, असे सांगून विखे म्हणाले की, या मिळालेल्या पैशातून काही प्रमाणात कामगारांची देणी आपण देऊ केली आहेत. राज्यात अनेक सहकारी संस्था बंद पडल्या, कारखाने विकले गेले, मात्र कामगारांची देणी कोणीही दिली नाहीत. मुळा-प्रवरा हे एकमेव असे उदाहरण आहे की, संस्था बंद झाल्यानंतरही कागारांसाठी आम्ही लढत आहोत. यापुढेही प्रत्येक कामगाराला न्याय मिळेपर्यंत लढावेच लागेल.
कामगारांच्या प्रश्नाचे राजकारण करून मोर्चे काढले गेले. पण कामगारांच्या प्रश्नासाठी कोणीही पुढे आले नाही. तुमच्यासाठी कोण लढत आहे याचा अंतर्मुख होऊन विचार करा, असे आवाहनही विखे यांनी केले. कामगार संघटनेच्या वतीने विखे यांना सन्मानित करण्यात आले.
(वार्ताहर)