कृषीसेवा केंद्राच्या दप्तराची अधिकाऱ्यांकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:47 AM2020-12-11T04:47:00+5:302020-12-11T04:47:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव व कोपरगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी पंडित वाघेरे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव व कोपरगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी पंडित वाघेरे यांनी बुधवारी (दि.९) कृषी दीपक या कृषीसेवा केंद्रातील नोंदी असलेल्या दप्तराची संयुक्तरित्या तपासणी केली. या तपासणीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोपरगाव शहरातील कृषी दीपक या कृषीसेवा केंद्रातून कोपरगाव तालुक्यातील वारी येथील पुरुषोत्तम दुर्गादास टेके या शेतकऱ्याला मुदत संपलेल्या बियाणाची विक्री केली होती. यासंदर्भात टेके यांनी संबंधित कृषीसेवा केंद्रावर कारवाईसाठी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारींचे वृत्तही लोकमतने मंगळवारी ८ डिसेंबरच्या अंकात प्रकशित केले होते.
या तपासणीत कृषीसेवा केंद्रात विक्रीस ठेवलेल्या बियाणांचे स्रोत ठेवलेले नाही, साठा रजिस्टरमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्यक्षात शिल्लक साठा जुळत नाही, ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर दुकानदाराची व ग्राहकाची सही केली जात नाही, विक्री केंद्रात, गोदामात मुदतबाह्य बियाणे बाजूला ठेवून हे बियाणे विक्रीस नाही, असा फलक लावलेला नाही, मुदतबाह्य बियाणांचा साठा नोंदवहीत शेरा मारून नोंदविलेला नाही, संपूर्ण अभिलेखाचा भाग म्हणून विक्री केलेल्या प्रत्येक लॉटचा नमुना एक वर्षासाठी जतन करून ठेवलेला नाही. प्रमाणित बियाणांच्या साठ्याबाबत लॉटनिहाय बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे वितरण अहवाल उपलब्ध नाहीत, तसेच सत्यतादर्शक लेबलच्या बियाणाबाबत स्रोताची माहिती ठेवलेली नाही. अशा सुमारे आठ त्रुटी आढळून आल्या आहेत.
................
शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार संबंधित कृषीसेवा केंद्राच्या नोंदी असलेल्या दप्तराची तपासणी केली आहे. त्यात आठ त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यानुसार केंद्रचालकास सात दिवसांच्या आत लेखी म्हणणे मांडण्याची नोटीस दिली आहे. त्यांचे म्हणणे आल्यानंतर कारवाईसंदर्भातील अहवाल तयार करून वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे.
- अशॊक आढाव, तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव
..............
फोटो१०कोपरगाव तपासणी