स्फोटप्रकरणी पोलीस महानिरीक्षक नगरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 01:40 PM2018-03-21T13:40:27+5:302018-03-21T13:40:50+5:30
अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरातील ढोर गल्लीत असलेल्या मारुती कुरिअर कार्यालयातील पार्सलमध्ये मंगळवारी रात्री उशीरा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत विशेष पोलीस महानिरीक्षक वियकुमार चौबे नगरमध्ये आले असून घटनास्थळाला भेट दिली आहे.
अहमदनगर : अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरातील ढोर गल्लीत असलेल्या मारुती कुरिअर कार्यालयातील पार्सलमध्ये मंगळवारी रात्री उशीरा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत विशेष पोलीस महानिरीक्षक वियकुमार चौबे नगरमध्ये आले असून घटनास्थळाला भेट दिली आहे. याशिवाय फॉरेन्सिक टीमकडून कार्यालयाची तपासणी सुरु आहे. अद्याप स्फोट नेमका कशाचा व कशामुळे झाला याची माहिती अद्यापपर्यत समोर आली नाही.
हे कुरिअरवर पुणे येथील वंदे मातरम संस्थेचे संजय नहार यांना नगर येथील सावेडीतून पाठविण्यात आले होते. मात्र सावेडीतील पत्ता चुकीचा असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कंपनीचे कर्मचारी एक पार्सल फोडत होते. याचवेळी अचानक स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने दुकानांच्या पाय-यांवर रक्ताचा सडा पडला होता. कोतवाली पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर पोलिसांच्या चौकशीत कुरिअरमधील पार्सल सावेडीतून आलेले होते. पुणे येथ्ी सामाजिक संस्था चालविणा-या सामाजिक कार्यकर्त्यांच्या नावे हे पार्सल पाठविण्यात आले होते. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थली नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला असून या घटनेचा कोतवाली पोलिसांसह दहशतवादी विरोधी पथक तपास करत आहेत.