बाळाला जन्म दिला अन् लगेच ढोलकीवर थाप, तमाशा करून मुलं उच्चशिक्षित करणाऱ्या 'शिवकन्या'ची कथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2023 12:53 PM2023-04-04T12:53:50+5:302023-04-04T12:56:29+5:30
प्रसूतीच्या कळा, बाळंतपण आणि लगेच दोन तासांत स्टेजवर ढोलकी वाजवायला उभी राहिली 'ती' माऊली
मच्छींद्र देशमुख, लोकमत न्यूज नेटवर्क, कोतूळ (जि. अहमदनगर): तमाशा सुरू होता. प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. बाळंतही झाले आणि त्यानंतर दोनच तासांत स्टेजवर ढोलकी वाजवायला उभी राहिले. तमाशा हाच उत्पन्नाचा मार्ग असून त्यातून एक मुलगी आणि एका मुलाला उच्चशिक्षित केले आहे. ते सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. महाराष्ट्रातल्या एकमेव महिला ढोलकी वादक शिवकन्या बढे यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपल्या खडतर आयुष्याचा पाढा वाचला.
अहमदनगर जिल्ह्यातील कोरडगावच्या रहिवासी असलेल्या शिवकन्या या नामवंत तमासगीर हरीभाई बढे यांची नात आणि नंदा नगरकर यांची कन्या. आठ महिने तमाशात आईबरोबर आणि पावसाळ्यात चार महिने शाळेत असे करताना चौथीपर्यंत शिक्षण झाले. तमाशातच नाचायला आणि वाचायला शिकले. तशातच ढोलकीचीही लय सापडली आणि लीलया ढोलकी वाजवू लागल्यापासून तमाशा क्षेत्रात वेगळं नाव झालं. बाई ढोलकी वाजवते म्हणून महिला मोठ्या संख्येने तमाशा पाहायला येतात. शहरात थिएटरवर तमाशा असेल तर तिकीट काढून महिला-पुरुषही ढोलकी ऐकायला येतात. हाच कलावंत म्हणून सन्मान आहे.
तमाशा जातोय अश्लीलतेकडे...
तमाशा कलावंतांकडे कलाकार म्हणून पाहायला हवं. सन्मान मिळायला हवा. टाकळी लोणारला माझ्या तमाशावर हल्ला झाला. हा वेदनादायी प्रसंग आयुष्यात विसरणार नाही. सध्या तमाशा आणि लावणी अश्लीलतेकडे झुकते आहे. लावणी नाचताना अंगभर नऊवारी, पायभर घुंगरू असावेत. मात्र सध्या पाठ आणि पोट उघडं ठेवून अश्लील हावभाव करून लावणी नाचली जाते याचं मात्र दुःख आहे.