प्रेरणादायी! कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलेसोबत तरुणाने केले लग्न, अहमदनगर जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 06:38 PM2021-12-06T18:38:11+5:302021-12-06T18:39:01+5:30
Ahmednagar : किशोर ढूस यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणा देणारे आहे. कोणत्याही मदतीपेक्षा कोरोना एकल महिलांना आधाराची गरज आहे.
राहुरी (जि. अहमदनगर) : कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या विधवा महिलेसोबत किशोर ढुस या तरुणाने लग्न केले. नऊ महिन्याचे बाळ असलेल्या महिलेसोबत लग्न करून किशोर ढूस यांनी आधार देत समाजासमोर आदर्श निर्माण केला.
ढूस यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणा देणारे आहे. कोणत्याही मदतीपेक्षा कोरोना एकल महिलांना आधाराची गरज आहे. तो आधार किशोर यांनी मिळवून दिला आहे. हे खूप मोठे धाडस असून सर्वांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी, असे मत तहसीलदार एफ. आर. शेख यांनी केले आहे. रविवारी (दि. ५) राहुरी अर्बन निधी संस्थेच्या वर्धापन दिन निमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे यांनी किशोर राजेंद्र ढुस यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी शेख बोलत होते.
राहुरी अर्बन निधी संस्थेने किशोर ढुस व त्यांची पत्नी यांचा साडी व कपडे भेट देऊन सत्कार करण्यात आला. नऊ महिन्याच्या बालकाच्या नावावर संस्थेने ११ हजार रुपयाची मुदत ठेव ठेवली. राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, त्यांच्या पत्नी कमल काळे, देवळाली हेल्प टीमचे अध्यक्ष दत्ता कडू, कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे, योग प्रशिक्षक किशोर थोरात, सुप्रसिद्ध कीर्तनकार आरती शिंदे उपस्थित होते.